बेळगाव लाईव्ह : विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून बेळगावमध्ये रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या शिवसन्मान पदयात्रेला विविध ठिकाणी उस्त्फुर्त पाठिंबा मिळत आहे. आज हि पदयात्रा अनगोळ भागात आयोजिण्यात आली होती. यावेळी पारंपरिक वेशभूषेत महिलांनी पदयात्रेचे उत्स्फूर्त आणि जल्लोषात स्वागत केले.
मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी तरुण, छत्रपती शिवाजी महाराज, प्रशासकीय अन्यायाविरोधात आवाज उठविणे, रोजगार यासह अनेक उद्देश ठेवून राबविण्यात येत असलेल्या या पदयात्रेची सुरुवात राजहंसगडापासून करण्यात आली होती. धामणे, अवचारहट्टी, बहाद्दरवाडी यासह अनेक ठिकाणी संचार करून आज अनगोळ भागात हि पदयात्रा पोहोचली.
ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे करण्यात येणारे स्वागत, जोरदार घोषणाबाजी आणि ठिकठिकाणी पदयात्रेतील कार्यकर्त्यांसाठी करण्यात आलेली चहा-पाण्याची-न्याहारीची व्यवस्था, स्वयंस्फूर्तीने पदयात्रेत सामील होणारे कार्यकर्ते, महिलावर्गाचा उत्स्फूर्त सहभाग यावरून पदयात्रेला मिळत असलेले यश लक्षात येते. मराठी जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचा प्रत्यय आज अनगोळ भागात दिसून आला.
पदयात्रेच्या समोर अश्व, भगवा ध्वज, आणि शेकडोंच्या संख्येने गल्लोगल्ली-गावोगावी जनजागृती करण्यासाठी संचार करत असलेले कार्यकर्ते यावरून बेळगावमध्ये पुन्हा मराठी भाषिक जनतेला जाग आल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पदयात्रेचे स्वागत पुष्पवृष्टी, रांगोळ्यांची सजावट, ध्वनिक्षेपकावरून पोवाडा आणि घोषणाबाजी करून करण्यात आले. प्रामुख्याने महिलावर्गाने घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. अनगोळ भागात प्रत्येक घराघरात औक्षण करून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.
या भागात असणाऱ्या मंदिरांमध्ये देखील पदयात्रा पोहोचली. यावेळी अनेक मंदिरांमधून रमाकांत कोंडुसकर यांच्याहस्ते पूजा करण्यात आली. या पदयात्रेत दुचाकीवरून सहभागी होणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक होती.
भगवा ध्व्ज हाती घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या युवक आणि महिला कार्यकर्त्यांमुळे पदयात्रेला वेगळीच ऊर्जा मिळाल्याचे दिसून आले. पदयात्रेला दिवसेंदिवस मोठा पाठिंबा मिळत असून पदयात्रेत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढत चालली आहे.