बेळगावचा अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू अमन नदाफ याने लडाख येथील पंगोंग येथे गेल्या 20 फेब्रुवारी रोजी समुद्रसपाटीपासून तब्बल 13,862 फूट उंचीवर आयोजित भारतातील पहिली गोठलेल्या तलावावरील मॅरेथॉन (फ्रोझन -लेक) शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण करून अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे.
भारतीय लष्कर आणि इंडो तिबेटियन सीमा पोलीसांनी (आयटीबीपी) योग्य कृती आराखड्याद्वारे पंगोंग येथील देशातील पहिल्या फ्रोझन -लेक मॅरेथॉनचे नियोजन केले होते.
सदर 21 कि. मी. अंतराच्या मॅरेथॉनचा शुभारंभ लुकूंग येथून झाला आणि मान गावाच्या ठिकाणी शर्यतीची सांगता झाली. भारतासह जगभरातील निवडक 75 ॲथलीट्सचा या खडतर शर्यती सहभाग होता. या सर्वांना सदर शर्यतीद्वारे जगातील सर्वात उंच फ्रोझन ‘लेक मॅरेथॉन विक्रमी वेळेत पूर्ण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नांव नोंदवण्याचा धाडसी प्रयत्न करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.
बेळगावचा अमन नदाफ हा एक उत्साही अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू असून आजपर्यंत त्याने अनेक अल्ट्रा मॅरेथॉन शर्यती यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
आता उपरोक्त फ्रोझन -लेक मॅरेथॉन शर्यतीतील यशाबद्दल क्रीडा क्षेत्रासह सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.