बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर विकास प्राधिकरणामध्ये कथित भूखंड घोटाळा झाल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या बेळगाव विभागाचे नेते राजकुमार टोपण्णावर यांनी आरोप करत हा मुद्दा उचलून धरला आहे.
या घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करत त्यांनी आंदोलन देखील छेडले आहे. दरम्यान, याप्रकरणी पुन्हा एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून जारी करत बुडा अधिकारी भूखंड घोटाळ्याप्रकरणी वारंवार खोटी विधाने आणि खोटी माहिती देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
टोपण्णावर यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये बुडा अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले असून बुडा अधिकारी मॅन्युअल लिलावासंदर्भात खोटी माहिती देऊन दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लोकायुक्त आणि जिल्हाधिकारी याप्रकरणी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असल्याचे निदर्शनात येत असून याप्रकरणी बेंगळुरूहून माहिती मागविण्यात येत असल्याची करणे देण्यात येत आहेत. प्रत्येक वेळी बुडा अधिकारी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देत असून माहितीच्या आधारे काही गोष्टींची सांगड घालता कोणत्याच गोष्टीत साम्य नसल्याचे आढळून येत आहे. याप्रकरणी झालेल्या कामकाजाच्या लेखी नोंदीत देखील तफावत आढळून येत आहे.
मॅन्युअल लिलावाप्रकरणी ज्या वृत्तपत्रांमधून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे ती वृत्तपत्रे माहिती विभागाच्या नियमानुसार जाहिरात प्रकाशित करण्यासाठी उचित नाहीत. शिवाय सदर जाहिरातींमध्ये ऑफलाईन मॅन्युअल लिलावाप्रकरणी कोणीतही माहिती समाविष्ट करण्यात आली नाही. यामुळे बुडाने मॅन्युअल ऑफलाईन भूखंड लिलावाप्रकरणी घोटाळा झाल्याचे उघड आहे.
याप्रकरणी जिल्हाधिकारी, लोकनियुक्त पोलीस विभागाने गांभीर्याने दखल देऊन या प्रकरणाची तातडीने चौकशी आणि तपास करावा, अशी मागणी राजकुमार टोपण्णावर यांनी केली आहे. बुडाच्या या कथित घोटाळ्याचा तपास लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही टोपण्णावर यांनी केला आहे.