बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल योजनेतील मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळत्या काढण्याचे काम सुरू असल्यामुळे बेळगाव शहरातील काही भागांमध्ये 20 ते 22 जानेवारी या काळात पाणी टंचाई उद्भवणार आहे.
या विभागात पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती एल अँड टी कंपनी व कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळाकडून देण्यात आली आहे.
हिडकल योजनेतील मुख्य जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती लागली असून गळती काढण्यासाठी आज 19 जानेवारी रोजी हिडकल जलाशयातून होणारा पाण्याचा उपसा बंद केला जाणार आहे. तसेच जलवाहिनीला पाच ठिकाणी लागलेली गळती एकाच वेळी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे 24 तास पाणीपुरवठा योजना असलेल्या दहा प्रभागांसह दक्षिण विभागातील मजगाव, नानावाडी, चिदंबरनगर, शहापूर, वडगाव, जुने बेळगाव या परिसरात तसेच उत्तर विभागातील सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, टीव्ही सेंटर, सदाशिवनगर, बसव कॉलनी, कलमेश्वरनगर, सुभाषनगर, अशोकनगर माळमारुती, न्यू गांधीनगर, कणबर्गी व कुडची या ठिकाणी पाणीटंचाई उद्भवणार आहे.
दरम्यान, राकसकोप जलाशयातील पाणी हिंडलगा येथील उपसा केंद्रात येते तेथून ते पाणी लक्ष्मी टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्राकडे नेले जाते आणि तेथून बेळगाव शहराला पाणीपुरवठा केला जातो.
त्यामुळे लक्ष्मी टेकडी येथून शहराच्या ज्या विभागाला पाणीपुरवठा केला जातो त्या विभागात पाणीटंचाई उद्भवणार नाही. हिडकल मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करून 22 जानेवारीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे एल अँड टी कंपनीचे प्रयत्न असल्याची माहितीही देण्यात आली आहे.