विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. राष्ट्रीय पक्षांनी बेळगाव मधील विविध मतदार संघामधून उमेदवार निवडी संदर्भात प्रक्रिया आधीपासूनच सुरू केल्या आहेत. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पक्षांच्या हालचाली ही गतिमान झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीने अद्याप निवडणुकी संदर्भात कोणतीही रूपरेषा ठरविली नाही. यासंदर्भात अलीकडेच ‘बेळगाव लाईव्ह’च्या माध्यमातून वृत्त प्रकाशित करण्यात आले हो. या वृत्ताची दखल घेत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार निवडी संदर्भात प्रक्रिया सुरू करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.
मराठा मंदिर येथे तालुका म. ए. समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उमेदवार निवडणुसंदर्भात चर्चा करण्यात आली असून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तालुका म. ए. समिती सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.
जानेवारी महिन्याच्या शेवटी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार जाहीर करावेत, अशी मागणी ‘बेळगाव लाईव्ह’च्या वृत्तात करण्यात आली होती. या वृत्ताची दखल घेत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून गावोगावी कमिटी नेमण्यात येणार आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तालुक्यात पोषक वातावरण देखील निर्माण होत आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघात राष्ट्रीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. याचप्रमाणे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीनेही रिंगरोड, बायपास विरोधातील लढ्यामधून व्यापक आंदोलन उभारले आहे. याच माध्यमातून समिती गावागावांत पोहोचत आहे. मात्र निवडणुकीच्या दृष्टिकोनातून समितीने लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली होती. कार्यकर्त्यांचा वाढता दबाव लक्षात घेत तालुका म. ए. समिती लवकरच उमेदवार निवड प्रक्रिया सुरू करणार आहे.
उमेदवार निवडीच्या दृष्टिकोनातून तसेच गावपातळीवर कमिटी नेमण्यात येणाऱ्या कमिटीच्या माध्यमातून 31 जानेवारीच्या आधी कार्यकारिणीसाठी प्रत्येक गावातून नावे देण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी म. ए. समितीने लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी केली. याबाबत बोलताना मनोहर किणेकर म्हणाले, समितीने उमेदवार जाहीर करावा, अशी लोकांची मागणी आहे. पण, गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही गावागावातून नावे द्यावीत, त्यातून कार्यकारिणी निवडून उमेदवार निवडीची प्रक्रिया करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, अजूनही अनेक गावांतून नावे आली नाहीत. त्यामुळे 31 जानेवारीच्या आधी सर्व गावांतून नावे देण्यात यावीत. त्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया राबवण्यात येईल, असे ते म्हणाले.
यावेळी कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सूचना मांडल्या. मागील अनेक निवडणुकीत बंडखोरीमुळे समितीला पराभूत व्हावे लागले होते. मात्र गावोगावी समितीमध्ये होत असलेली एकजूट पाहून राष्ट्रीय पक्ष हादरले असून भेटवस्तू वाटून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आता मराठी माणसाची एकी अभेद्य ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, अशा सूचना कार्यकर्त्यांतून मांडण्यात आल्या.
यावर मनोहर किणेकर, शिवाजी सुंठकर, सरस्वती पाटील, आर. एम. चौगुले, अॅड. सुधीर चव्हाण, रामचंद्र मोदगेकर आदींनी निवडणुकीत कोणत्याही प्रकारे बंडखोरी होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. शिवाय या निवडणुकीत प्रत्येकाने स्वतः उमेदवार असल्याची भावना ठेवून समितीला विजयी करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
ही बातमी देखील वाचा…
ग्रामीण मतदार संघासाठी समितीने लवकर रणनीती आखण्याची गरज