Tuesday, December 24, 2024

/

स्टार एअरने भाड्याने घेतले आणखी दोन एम्ब्रेर ई 175 जेट

 belgaum

संजय घोडावत ग्रुपच्या स्टार एअरलाइन्स या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपनीने जगातील सर्वात मोठ्या प्रादेशिक विमानं भाड्याने पुरविणाऱ्या नार्डीक एव्हिएशन कॅपिटल (एनएसी) या विमान कंपनीकडून आणखी दोन एम्ब्रेर ई 175 प्रवासी जेट विमाने भाडे करारावर घेतली आहेत.

सदर दोन विमानांसह स्टार एअरने यापूर्वी गेल्या ऑगस्ट 2022 मध्ये युनायटेड किंगडम येथे झालेल्या फर्नबोर्ग इंटरनॅशनल एअर शोमध्ये दोन एम्ब्रेर ई 175 जेट विमानाची ऑर्डर दिली होती. या पद्धतीने भाड्याने वापरण्यासाठी ऑर्डर दिलेल्या एकूण चार विमानांपैकी पहिल्या विमानाचे या महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये स्टार एअरच्या ताफ्यात आगमन होणार आहे. देशांतर्गत प्रादेशिक कनेक्टिव्हिटी अधिक सुधारावी या उद्देशाने एनएसीकडून स्टार एअरने हा चार विमानांचा ताफा भाड्याने घेतला आहे. मजबूत क्षमतेची जीइ सीएफ 34-8ई इंजिन्स असणारी ई175 विमानांनी विश्वसनीयता आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत प्रादेशिक जेट विभागात आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. उत्तम सुखकर आसन व्यवस्था असलेल्या या विमानाचा उड्डाण पल्ला (फ्लाईंग रेंज) 2200 नॉटिकल मैल इतका आहे. या विमानांच्या मदतीने आता स्टार एअर दीर्घ पल्ल्याच्या, जलद आणि सहज सुरळीत विमान सेवेसाठी सज्ज झाले आहे.

सध्या देशभरातील 14 शहरांना प्रवासी विमान सेवा देणारी स्टार एअर एअरलाइन्सने आता आपले प्रादेशिक अस्तित्व वाढविण्याची तयारी केली आहे. स्वतः स्टार एअर एअरलाइन्सचे संचालक श्रेणिक घोडावत यांनी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन स्टार एअर आपल्या विमानसेवा वाढवत असल्याचे जाहीर केले आहे. आमच्या विमानांच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नव्या चार विमानांमुळे प्रवाशांच्या गरजेची पूर्तता होण्याबरोबरच देशभरात जोडले जाण्यास आम्हाला मदत होणार आहे. एम्ब्रेर ई175 जेट विमानाचा आम्हाला चांगला सदुपयोग होण्याबरोबरच जास्तीत जास्त उपलब्धता आणि प्रवाशांची विश्वासाहर्तता प्राप्त करण्यास मदत मिळणार आहे, असे घोडावत यांनी स्पष्ट केले.

देशातील 19 शहरांना प्रवासी विमान सेवा देण्यासाठी सध्या स्टार एअर आपल्या पाच एम्ब्रेर ई145 विमानांचा वापर करत आहे. या विमानांद्वारे अहमदाबाद, अजमेर (किशनघर), बेंगलोर, बेळगाव, दिल्ली, हुबळी, इंदोर, जोधपुर, कलबुर्गी, मुंबई, सुरत, तिरुपती, जामनगर, हैदराबाद, नागपूर, भुज, बिदर आणि कोल्हापूर या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.