प्रकृती अचानक बिघडून बेळगाव रेल्वे स्थानकात कोसळलेल्या एका असहाय्य प्रवाशाला फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी पोलिसांच्या मदतीने अवघ्या 18 मिनिटात हॉस्पिटलमध्ये दाखल करून जीवदान दिल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, फेसबुक फ्रेंड्स सर्कलला (एफएफसी) आज सकाळी एक फोन आला फोनवरील व्यक्तीने महाराष्ट्राकडे प्रवास करणारा गजानन ठाकूर नावाचा एक प्रवासी अत्यावस्थ अवस्थेत बेळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर कोसळल्याची माहिती दिली.
तेंव्हा एफएफसीचे प्रमुख संतोष दरेकर यांनी तात्काळ सदर प्रकाराची पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांना देऊन आपल्या सहकाऱ्यांसमोर रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. दरम्यान पोलीस उपायुक्त गडादी यांनी कॅम्प पोलिसांना घटनास्थळी धाडले. त्यावेळी गजानन ठाकूर नाम संबंधित प्रवासी फिट येऊन तोंडातून फेस येत असलेल्या अवस्थेत रेल्वे स्थानकात जमिनीवर पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तेव्हा संतोष दरेकर यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिका मागून पोलिसांच्या मदतीने काहीशा गंभीर अवस्थेत असलेल्या गजानन ठाकूर याला तात्काळ बीम्स हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले. त्यानंतर बिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांनीही रुग्ण ठाकूर याला तपासण्यासाठी इमर्जन्सी कॅच्युलिटी वार्डकडे धाव घेतली.
पोलिसांच्या मदतीने एफएफसीचे संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर आणि नारू निलजकर यांनी अवघ्या 18 मिनिटात हे मदत कार्य केल्याबद्दल त्यांची प्रशंसा होत आहे.