बेळगाव लाईव्ह : रस्त्यांच्या दुर्दशेबाबत नागरिक तक्रारींचा महापूर पाडत आहेत. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले जाईल, अशी एक बाब समोर आली असून गेल्या चार वर्षात सातत्याने होणाऱ्या अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या पाहता बेळगावमध्ये प्रशासन, लोकप्रतिनिधींचे रोड क्राईम वाढल्याची हास्यास्पद खिल्ली नागरिक उडवत आहेत. तर दुसरीकडे वाहनचालक वाहतुकीचे नियम पळत नसल्याने अपघात वाढत असल्याची तक्रार रहदारी विभागातील पोलीस अधिकारी करत आहेत.
रस्ते सुरक्षेबाबत जनतेमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी देशभरात ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ साजरा केला जातो. मात्र नागरिकांमध्ये वाहतुकीचे-रहदारीचे नियम आणि सूचना देणारे उपक्रम राबविण्यात येत नाहीत, हि खंत आहे. हेल्मेटसक्ती, वाहन कागदपत्रे यासह अनेक सूचना, नियम, अटी आणि सूचनांचा पाढा वाचला जातो, नव्हे तर यासाठी जाचक कारवाई केली जाते. मात्र रस्ते आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर निवडणुकीचा कालावधी सोडला तर कधीही गांभीर्याने कारवाई केली जात नाही, हे दुर्दैव आहे.
केवळ पद, सत्ता, राजकारण यामागे लागलेल्या राजकारण्यांना बेळगावमधील अपघातांचे भान राहिले नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सध्या सुरु असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मिळालेल्या माहितीतून बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या चार वर्षात ५४९ जणांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. इतकेच नव्हे तर विविध ठिकाणी २ हजारहून अधिक अपघात घडले असून यातील १००० हुन अधिक जण अपंग झाले आहेत. तर दीड हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील जवळपास १६ पोलीस स्थानकात २०१९ ते २०२२ या काळात सुमारे २ हजार हुन अधिक अपघात घडल्याची नोंद आहे.
बेळगावची वाढती रहदारी पाहता बेळगावमधील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. केवळ रस्ते आणि खड्डे इतकेच कारण अपघातासाठी कारणीभूत नसून बहुतांशी नागरिक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसल्यानेही अपघात घडत आहेत. बेळगाव शहराचा होत असलेला विकास पाहता रस्त्यावर भरमसाट वाहनांची संख्या वाढली आहे. इतर शहरांच्या तुलनेत रहदारी आणि इतर शहरांच्या तुलनेत हेल्मेटसक्ती बेळगावमध्ये अधिक असूनही अपघातांची संख्या हि विचार करण्याजोगी आहे. गेल्या ४ वर्षात झालेल्या अपघातात मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश आहे. वेगाच्या आवेगात वाहन चालविणाऱ्या तरुणाईला आपल्या जीवाची पर्वा नसते. मात्र अनेकवेळा धूम स्टाईलने वाहन चालविणाऱ्या तरुणांमुळे इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.
आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकप्रकारचे संदेश पाठविले जातात. मात्र अशा गोष्टींसाठी जनजागृती केली जात नाही. आज बेळगावमध्ये मोठ्या स्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र रस्ता सुरक्षा म्हणजे नेमकं काय याबाबत जागृती केली जात नाही. हेल्मेटसक्तीसह अनेक जाचक नियम लावून ते काटेकोरपणे पाळण्यासाठी रहदारी विभाग कटाक्षाने लक्ष देतो. मात्र अपघात टाळण्यासाठी काय करता येईल यासाठी मात्र कोणताही उपक्रम विशेषतः राबविला जात नाही, हि खेदजनक बाब आहे.
अवजड वाहनांची वाहतूक, अवजड वाहनांसंदर्भात नियम, पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना, चुकीच्या बाजूने वाहने चालविणे, ओव्हरलोड प्रकार रोखणे यासारखे अनेक उपक्रम हाती घेऊन सामाजिक स्वयंसेवी संस्था आणि रहदारी विभागाने पुढाकार घेतला तर खऱ्या अर्थाने रस्ता सुरक्षा सप्ताह सत्कारणी लागेल.