बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चुरस ग्रामीण भागात पाहायला मिळणार हे आता जगजाहीर झाले आहे. राष्ट्रीय पक्षांपेक्षाही भाजपच्या माजी मंत्र्यांच्या स्वप्रणीत उमेदवाराची अप्रत्यक्ष टक्कर आणि विद्यमान ग्रामीण आमदार यांच्यातील ‘टफ फाईट’ पहायला मिळणार आहे. विद्यमान ग्रामीण आमदारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी भेटवस्तूंचा सपाटा सुरु केला आहे.
या भेटवस्तू वाटपासाठी नवनवीन शक्कल लढविण्यात येत आहेत. कधी नारळ, तर कधी शपथ तर कधी आणखी काय! नारळाची गोष्ट सोशल मीडियावर वायरल झाल्याने सध्या ग्रामीण मतदार संघात रांगोळी स्पर्धेचे पेव फुटले आहे. या रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातूनही अनेकांनी आपला विरोध व्यक्त केला. मात्र विद्यमान लोकप्रतिनिधींनी हि मोहीम जशास तशी सुरु ठेवली.
आज हिंडलगा मतदार संघात काही ठिकाणी रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वॉट्सअप, फेसबुक, गल्लीतील कार्यकर्ते आणि काही समर्थकांच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धेचे ‘प्रमोशन’ देखील करण्यात आले. स्वतः ‘अक्का’ रांगोळी पाहण्यासाठी येणार असा मेसेज वॉट्सऍपच्या माध्यमातून पोहोचविण्यात आला.मात्र, प्रत्यक्षात अक्का पोहोचल्याच नाहीत!घरोघरी जाऊन भेटवस्तूंसाठी कुपन वाटण्यात आले.
यादरम्यान काही मतदार आणि अक्कांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रसंग देखील घडले. काहींना कुपन देण्यात आले तर दुपारनंतर काहींना कुपन संपल्याचे कारण सांगून अचानक भेटवस्तू देण्याचे काम थांबविण्यात आले….!
या साऱ्या गोंधळात घरातील पुरुष मंडळींची मात्र नाहक फरफट काही महिला मतदारांनी केली असल्याचे चित्रही पाहायला मिळाले. आधी घरी येणाऱ्या अक्कांच्या कार्यकर्त्यांकडून दिले जाणारे कुपन घेण्यासाठी धावपळ आणि त्यानंतर ते कुपन घेऊन गावाबाहेर व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणी भेटवस्तू घेण्यासाठीची धावपळ.. अनेक महिलांनी ‘स्पेशल रिक्षा’ करून भेटवस्तू घेण्यासाठी धावपळ केली.
काही महिलांनी तर घरातील पुरुष मंडळींना कामावर जाण्यापासूनही रोखले. मात्र, अर्ध्यावरच रांगोळी मोहीम संपली आणि त्याचबरोबर कूपनही संपले. यामुळे महिलावर्गाचा हिरमोड झालाच शिवाय पुरुष मंडळींची सुट्टीही वाया गेली! पहाटेपासून रांगोळीची तयारी करून आक्कांची वाट पाहणाऱ्या महिलांनी दुपारपर्यंत वाट पाहून अक्कांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नावावर बोटे मोडण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी भेटवस्तू घेण्यासाठी स्पष्ट नकार देणारे मतदारही पाहायला मिळाले. त्या-त्या भागातील अक्कांच्या कार्यकर्त्यांकडून गेले ८ दिवस भेटवस्तूच्या कूपनसाठी वाट पाहणाऱ्या मतदारांच्या पदरी मात्र आजही निराशा पाहायला मिळाली.
आधी मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड दाखवून कुपन आणि त्यानंतर भेटवस्तू अशा पद्धतीच्या मोहिमेचा आज फज्जा उडाल्याचे हिंडलगा मतदार संघात पाहायला मिळाले. त्यामुळे ‘ना रांगोळी, ना मिक्सर आणि सुट्टी गेली फुक्कट’अशी परिस्थिती हिंडलगा व्याप्तीतील नागरिनची झाली होती.!!!!!