काँग्रेस मधून सिद्धरामय्या यांच्या नावाची चर्चा असलेल्या मतदार संघात भाजपकडून देखील उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सौंदत्ती यल्लमा मतदार संघातून भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू झाली आहे. दिवंगत आमदार आनंद मामणी यांच्या धर्मपत्नी रत्ना मामणी यांच्यासह चौघेजण तिकिटासाठी प्रबळ दावेदार मानले जात असले तरी अनेक जण भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी या मतदारसंघात भाजप संघटना आधारित लॉबी बरोबरच जाती आधारित लॉबी जोमाने कार्यरत झाली आहे. आनंद मामणी यांच्या धर्मपत्नी रत्ना मामणी तिकिटासाठी राज्यातील भाजप नेत्यांना साकडे घालत असताना या मतदारसंघातील अन्य तिघेजण भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत.
सौंदत्ती मतदारसंघातील भाजपच्या तिकिटासाठी रत्ना मामणी, मडिवाळप्पा बिदरगट्टी, संजीवकुमार नवलगुंद, आणि रुद्रण्णा चंदरगी हे इच्छुक आहेत. हे सर्व इच्छुक उमेदवार संघ परिवाराचे कट्टर कार्यकर्ते आहेत. भाजप नेते घराणेशाहीला महत्त्व न देता नव्या चेहेराच्या संधी देणार असल्यामुळे या मतदारसंघात सर्वांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसत आहे.
मडिवाळप्पा बिदरगट्टी हे गेली अनेक वर्षे संघ परिवाराचे क्रियाशील सदस्य आहेत. त्याचप्रमाणे त्यांची पत्नी भाग्यज्योती यादेखील भाजपमध्ये सक्रिय आहेत. बिदरगट्टी हे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे शिष्य असण्याबरोबरच भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांचे नातलग आहेत.
बिदरगट्टी हे राज्य पातळीवरील भाजप नेत्यांच्या संपर्कात असून त्यांनी कुरूब समाजाच्या कोट्यामधून भाजपच्या तिकिटाची मागणी केली आहे. रा. स्व. संघ आणि भाजपमध्ये अनेक वर्षापासून सामान्य परंतु निष्ठावंत कार्यकर्ता असलेले पंचमसाली समाजाचे संजीवकुमार नवलगुंद यांनी देखील भाजपच्या तिकिटासाठी अर्ज केला आहे. बऱ्याच जणांनी भाजप नेत्यांच्या भेटी घेऊन नवलगुंद यांना तिकीट द्यावे अशी विनंती केली आहे. रुद्रण्णा चंदरगी हे देखील संघ परिवार भाजप आणि पंचमसाली समाजाचे क्रियाशील कार्यकर्ते आहेत. याखेरीज ते दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात. रुद्रणणा आता खासदार मंगला अंगडी यांच्या पाठिंबाने सौंदत्ती मतदार संघातून भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
एकंदर सौंदत्ती मतदारसंघात भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू झाली आहे. तिकिटासाठी भाजप हाय कमांडने घराणेशाहीला प्राधान्य दिल्यास रत्ना मामणी यांची उमेदवारी निश्चित आहे.
मात्र जर घराणेशाहीला प्राधान्य दिले नाही तर बिदरगट्टी, नवलगुंद आणि चंदरगी यांच्यात भाजपच्या उमेदवारीसाठी तिरंगी चुरस होणार आहे.
या तिघांव्यतिरिक्त बसवराज पट्टणशेट्टी व अजितकुमार देसाई हे देखील भाजपच्या तिकिटाचे प्रबळ दावेदार मानले जातात. या दोघांनी आतापासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.