गेल्या चार-पाच महिन्यापासून बेळगाव शहराच्या रिंग रोडच्या विरोधात शेतकऱ्यांच्यावतीने सातत्याने आंदोलन करणाऱ्या बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी थेट केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा बेळगावचा रिंग रोड रद्द करण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज शनिवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचे औचित्य साधून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या शिष्टमंडळाने सकाळी कोल्हापूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.सीमा भागातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केला जात आहेत.
याचबरोबर अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी विविध शासकीय योजनांच्या नावाखाली संपादित केल्या जात आहेत. यामुळे बेळगाव सीमाभागातील शेतकरी अडचणीत आले आहेत. या संदर्भात गडकरी यांना निवेदन देतानाच, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली. निवेदना सोबत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने शेतकऱ्यांचा असलेला रिंग रोडला विरोध आणि रिंग रिंग रोडमुळे शेत जमिनीचे किती नुकसान होणार आहे, या संदर्भात माहिती देणारा जो व्हिडिओ बनवला आहे. त्याची सीडी केंद्रीय मंत्री गडकरी यांना दिली.
निवेदनाचा स्वीकार करून बोलताना मंत्री गडकरी यांनी आपण कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून बेळगाव रिंग रोडला होणारा विरोध व शेतपिकांचे होणारे नुकसान याबाबत थोडीफार माहिती आपल्याला मिळाली आहे. त्यासाठी आपण सखोल माहिती घेऊन रिंग रोड प्रस्ताव रद्द करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करू असे स्पष्ट केले. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावच्या रिंग रोडमुळे तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागणार असल्यामुळे रिंग रोड रद्द करून त्या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिज उभारावा असा प्रस्ताव मांडला आहे.
कारण रिंग रोडमुळे तालुक्यातील 32 गावांमध्ये शेतकऱ्यांची सुमारे 1300 एकर सुपीक टिकाऊ जमीन नष्ट होणार असून या प्रकल्पासाठी हजारो कोटींचा खर्च येणार आहे. या तुलनेत जर फ्लाय ओव्हर ब्रिज उभारला तर फक्त 28 एकर जमीन जाणारा असून या प्रकल्पासाठीचा खर्च देखील तुलनात्मक दृष्ट्या अत्यंत कमी म्हणजे जवळपास 500 कोटीपर्यंत जाणार आहे. समितीचा हा प्रस्ताव प्रथम दर्शनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पसंत पडला असून त्यांनी त्याबाबत जरूर विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.
यावेळी बेळगाव तालूका म. ए. समीतीचे सेक्रेटरी ॲड. एम. जी. पाटील,माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, कृष्णा हुंद्रे, आर. आय. पाटील, पुंडलिक पावशे,मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, एपीएमसी माजी सदस्य सदस्य महेश जुवेकर, दत्ता उघाडे, प्रदीप ओऊळकर, माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, कृष्णा हुंद्रे, आर. आय. पाटील, पुंडलिक पावश आदी उपस्थित होते.