Monday, April 29, 2024

/

सीमावासीयांनी मराठी निष्ठेने जपली, पुजली : डॉ. श्रीपाल सबनीस

 belgaum

बेळगाव : सुब्रमण्यम साहित्य अकादमी, माचीगड-अनगडी येथे २६ वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १ जानेवारी २०२३ रोजी दिमाखात पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस हे होते. संमेलनाची सुरुवात वारकरी संप्रदायाच्या भजनी ठेक्यातून ग्रंथदिंडीने झाली. संपूर्ण गावात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण, चौकाचौकांची करण्यात आलेली सजावट, रांगोळ्यांनी सजलेले रस्ते आणि संमेलन मंटपापर्यंत करण्यात आलेली आंबोत्यांची आरास यामुळे संपूर्ण माचीगड संमेलन नगरी उत्साहाने भारून निघाली होती.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन पार पडल्यानंतर काव्यसंग्रह आणि विशेषांकाचे प्रकाशन पार पडले. पी. एल. डी. बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यांच्याहस्ते प्रवेशद्वाराचे उद्घाटन आणि खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी यांच्याहस्ते सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागताध्यक्ष पीटर डिसोझा यांनी प्रास्ताविक केले.

संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्थानिक मुद्द्यावर भाषण केले. स्थानिक साहित्य विश्व, कन्नड मराठी साहित्य विश्वाचा अनोखा मेळ घालत केलेले सर्वांग सुंदर भाषण शेवटपर्यंत रसिकांना जागेवरच खिळवून ठेवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, सत्याची पेरणी करण्यासाठी, पूजा करण्यासाठी, समाज प्रबोधनासाठी साहित्य संमेलने महत्वाचे कार्य पार पाडतात. दुःख मुक्त मानवता हा आपल्या संस्कृतीचा ध्येयवाद आहे. ही संस्कृती जपण्यासाठी साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे. सहजीवन आणि सहअस्तित्व अर्थपूर्ण आणि सुखपूर्ण व्हावं यासाठी साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे. मराठी भाषेची निष्ठा सीमाबांधवांनी जपली, पुजली. मराठी श्वास आणि मराठी ध्यास मानणाऱ्या सीमावासीयांना आज दहशतीमध्ये वावरावं लागतं, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. मराठी ही जोडणारी भाषा आहे. वारकऱ्यांची, संतांची परंपरा असलेल्या समृद्ध मराठीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि हा अभिमान गाजविणे आमचा हक्क आहे. जर हा हक्क गाजविणे चुकीचे आहे असे मला वाटत नाही. आईच्या भाषेवर दडपण आणणारे हे कुठले सरकार आहे? असा रोखठोख सवाल उपस्थित करत कर्नाटक सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.

 belgaum
Shripal sabnis
मराठी साहित्यिक श्रीपाल सबनीस माचीगड खानापूर येथील साहित्य संमेलनास संबोधित करताना…

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, माणसाने शांततेनं जगायचं असेल तर सहजीवनात संवाद महत्वाचा आहे. आज भारतासमोर विश्वशांतील आव्हान देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. भगवान बुद्ध, महावीर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद अशा अहिंसावादी महापुरुषांची बेरीज केली तर भारतासारखे सामर्थ्य कोणत्याही देशात नाही. भारत हा आर्थिकदृष्ट्या महासत्ता नसला तरी भारत हा खऱ्या अर्थाने महासत्ता आहे. भारताची एकात्मता टिकविणे गरजेचे आहे. भारताचे संविधान शांततेनं जगायला शिकवते. शांततेचे संस्कार करणाऱ्या संविधानाबद्दल साक्षरता महत्वाची असून यासाठी प्रत्येकाने आणि प्रामुख्याने राजकारण्यांनी पुढाकार घेणे महत्वाचे असल्याचे मत त्यांनी मांडले. यावेळी सीमाभागात भरविण्यात येणाऱ्या संमेलनांचे त्यांनी भरभरून कौतुक केले. तसेच सीमाप्रश्नी शांततेने आणि सौहार्दाने प्रत्येकाने भूमिका मांडण्याचे आवाहन केले.

या साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि जागतिक पर्यावरणवादी प्रा. राजेंद्र केरकर यांचे ‘म्हादई – मलप्रभा खोऱ्यातील भक्ती परंपरा’ या विषयावर व्याख्यान झाले. यानंतर तिसऱ्या सत्रात बहारदार कविसंमेलन पार पडले. भारत गावडे, सुधाकर गावडे, कृष्णा पारवाडकर, संजय वाटूपकर यांनी आकर्षक आणि अंतर्मुख करणाऱ्या कवितांचे याचप्रमाणे हास्याचे फवारे उडविणाऱ्या कवितांचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.Machigad sahitya sammelan

साहित्याच्या या बहारदार जादूनंतर चौथ्या सत्रात नंदगड येथील जागतिक कीर्तीचे जादूगार प्रेमानंद पाटील यांच्या खऱ्याखुऱ्या जादूच्या प्रयोगाने रसिकांचे मनोरंजन केले. साहित्याच्या मंचावरून प्रथमच जादूचे प्रयोग सादर केले गेले. जादूगार प्रेमानंद पाटील यांनी जादूचे अनेक प्रयोग करून अबालवृद्धांचे मनोरंजन केले.

संमेलन मार्ग तसेच संमेलन मंडपात आकर्षक आणि लक्षवेधी हस्ताक्षरात सुविचारांचे, साहित्यिक वचनांचे संदेश देणारे फलक विशेष लक्षवेधी ठरले. शिवाय संमेलनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, साहित्यप्रेमी, रसिक, प्रेक्षकांची गर्दी शेवटपर्यंत संमेलन मंटपात खिळलेली दिसून आली. माचीगड येथे पार पडलेले संमेलन हे साहित्यिक उंची गाठणारे संमेलन ठरले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.