बेळगाव लाईव्ह : समाजासाठी समाजकार्याची केवळ आवड असणे पुरेसे नाही. समाजाच्या तळागाळात जाऊन जातीने लक्ष घालून, समाजाशी एकरूप होऊन समाजासाठी काहीतरी करण्याचा मानस असणे हेही तितकेच महत्वाचे आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघातील मराठा समाजाचे नेतृत्वही अशाच समाजकार्याने भारलेले आहे. बेळगावमधील भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते, मराठा समाजाचे नेते आणि राज्य ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव यांनी समाजकार्याचा विडा उचलला आहे.
विविध समाजाभिमुख उपक्रम, अडीअडचणीच्या काळात तळमळीने नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेणे, शासकीय कामकाजात येणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन करून त्या वैयक्तिकरित्या सोडविणे, सकल मराठा समाजाच्या उन्नतीसाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करून समस्त मराठा समाजाला एकसंघरीत्या एकवटणे अशा विविध कौशल्यांमुळे दक्षिण मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी किरण जाधव यांना उमेदवारी देण्याची मोठी मागणी होत आहे.
वीस वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पक्षात निष्ठेने कार्य करणाऱ्या किरण जाधव यांचे संघटनात्मक कार्य ओळखून पक्षाने त्यांच्यावर ओबीसी मोर्चाच्या राज्य सचिव पदाची जबाबदारी सोपविली आहे. किरण जाधव यांनी मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी महत्वाची भूमिका घेत बेंगळुरू येथील गोसावी मठाच्या श्री श्री मंजुनाथ स्वामींच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला एकवटण्याचे कार्य केले.
छत्रपती शिवरायांच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या मठात मराठा समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि मराठा समाजाचे नेतृत्व करण्यासाठी झटणाऱ्या श्री श्री मंजुनाथ स्वामी आणि बेंगळुरू येथील मराठा समाजाशी निगडित असणाऱ्या गोसावी मठासंदर्भात किरण जाधव यांनी मराठा समाजाला गुरुवंदना या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्वपूर्ण माहिती दिली. आजतागायत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाबाबत सकारात्मक पद्धतीने कामगिरी केली नसून किरण जाधव यांच्या माध्यमातून बेळगावमधील मराठा समाजाला बळ देण्याचे कार्य पार पडले आहे.
सातत्याने शासकीय पातळीवर आरक्षणप्रश्नी पाठपुरावा केला. ३बी मधून २ए श्रेणीत आरक्षण मिळवून शैक्षणिक, आर्थिक पातळीवर मराठा समाजाची प्रगती व्हावी या उद्देशाने सकल मराठा समाजाच्या माध्यमातून मोलाची कामगिरी बाजवणाऱ्या किरण जाधव यांची केवळ मराठा समाजासाठीच नव्हे तर मराठा समाजांतर्गत येणाऱ्या सर्व पोटजातींविषयी आणि इतर समाजाविषयीही तितकीच तळमळ आहे. समाजाचा उधार व्हावा, समाजातील सर्व स्तरातील लोकांची शैक्षणीक, आर्थिक, व्यावसायिक प्रगती व्हावी, या उद्देशाने प्रत्येकाच्या मदतीला तळमळीने धावून जाणाऱ्या किरण जाधव यांना जनतेचाही मोठा पाठिंबा आहे.
विविध शैक्षणिक उपक्रम, धार्मिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणारे स्पर्धापरीक्षा यासारखे उपक्रम, विमल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सेवाभावी आणि समाजाभिमुख उपक्रम राबवून किरण जाधव यांनी जनतेवर आपली विशिष्ट अशी छाप पाडली आहे. त्यांच्या नेतृत्वगुण कौशल्यामुळे दक्षिण मतदार संघात त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा आहे.
मराठा समाजातील नेते असणारे किरण जाधव यांनी मराठा समाजासह सर्व स्तरातील समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक ध्येयधोरणे ठरविली आहेत. किरण जाधव यांच्यातील संघटनात्मक, समाजाभिमुख आणि नेतृत्वगुणकौशल्ये यापुढील काळातही जनतेसाठी नक्कीच हितावह ठरतील, यात शंका नाही. किरण जाधव यांना त्यांच्या जन्म दिनी टीम बेळगाव live कडून शुभेच्छा!!!