बेळगाव : पाश्चात्य संस्कृतीचे अनुसरण करणाऱ्या तरुणाईने ३१ डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांना लक्ष करून गडाचे पावित्र्य भंग करण्याचा प्रकार सुरु केला आहे. मद्यपान, हिडीस नृत्य, गोंधळ माजवून गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करू पाहणाऱ्या तरुणाईला रोख लावण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने तालुक्यातील येळ्ळूर येथील राजहंसगडावर खडा पहारा दिला.
गेल्या ५ वर्षांपासून श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली खडा पहारा उपक्रम राबविण्यात येत असून या माध्यमातून गडकिल्ल्यावर प्रबोधन, मर्दानी खेळ, लाठीमेळा, पूजाविधी असे विविध हिंदू धर्मानुसार कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
३१ डिसेंबर रोजी पाश्चात्य संस्कृतीला अनुसरून होणारा प्रकार रोखण्यासाठी तसेच किल्ल्याचे पावित्र्य राखण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे असंख्य कार्यकर्ते रात्रभर जागून हा उपक्रम राबवत आहेत.
शनिवारी सायंकाळी ७ वाजता राजहंसगड येथे सुमारे ६०० ते ७०० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. इस्कॉनचे सरजू पंडित यांच्यासह एकूण ५ प्रवचनकारांच्या उपस्थितीत प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला.
हिंडलगा येथील शाहीर देवगेकर यांनी पोवाडा सादरीकरण केले तर सुरज बिर्जे यांनी लाठी आणि मर्दानी प्रात्यक्षिके सादर केली.
सायंकाळी ७ ते १२ पर्यंत मर्दानी खेळ, लाठीमेळा, प्रबोधन, पोवाडा, भजन, आरती यासह विविध धार्मिक उपक्रम राबवून जागरण करण्यात आले. त्यानंतर भोजनाचा आस्वाद घेऊन पहाटे ५ वाजता गडाची स्वच्छता करून कार्यकर्ते पुन्हा माघारी परतले.
पाश्च्यात्य संस्कृतीला अनुसरून आपल्या धर्माची आजच्या तरुणाईकडून करण्यात येत असलेली विटंबना आणि हिडीस प्रकार रोखण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी काल खडा पहारा देत गडाचे पावित्र्य राखले.