बेळगाव लाईव्ह : तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक या गावातील ग्रामपंचायतीत आज भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गोंधळ झाला. ग्राम पंचायत सदस्या रेखा इंडीकर आणि ग्रामस्थ सुनील बांद्रे यांनी उर्वरित ३३ जणांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आज बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत वादावादी होऊन गोंधळ निर्माण झाला.
कंग्राळी बी. के. ग्रामपंचायतीच्या सदस्या रेखा इंडीकर यांनी ग्रामपंचायत अध्यक्षा, उपाध्यक्ष आणि पीडीओ तसेच सदस्यांना नोंद, ट्रान्स्फर, संगणक उतारा यासाठी ठराव मांडण्यात यावा, असे त्यांनी सुचवले होते. १६ नोव्हेंबरच्या मासिक बैठकीदरम्यान या मुद्द्यावर ठराव मांडून तो संमत करावा अशी मागणी केली होती. मात्र, इतर सदस्यांनी याला नकार दिला असल्याचा आरोप सौ. इंडीकर यांनी केलाय.
शिवाय ग्रामपंचायत सदस्य भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत निवेदन सादर केले होते. एका उताऱ्यासाठी ४८ हजारांची मागणी करण्यात येत असून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोपही रेखा इंडीकर यांनी केला आहे.
रेखा इंडीकर यांनी केलेल्या आरोपाला विरोध करत उर्वरित सदस्यांनी आज आपल्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे पुरावे सादर करण्याची मागणी केली. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे धादांत खोटे असून याचे कोणतेही पुरावे रेखा इंडीकर यांच्याकडे नसल्याचे यावेळी उपस्थित सदस्यांनी सांगितले. यादरम्यान रेखा इंडीकर, जमीन व्यवहार प्रकरणातील ग्रामस्थ आणि उर्वरित ३३ ग्रामपंचायत सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
रेखा इंडीकर यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यानिशी सिद्ध झाल्यास सामूहिक राजीनामा देण्याची तयारीही यावेळी कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी दाखविली. या पंचायतीत झालेला हा गोंधळ आज सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण बेळगावमध्ये वायरल झाला असून यापूर्वी महानगरपालिका सभागृहात होणार गोंधळ आता गावपातळीवरदेखील दिसून येत असल्याबाबत नागरीकातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.