बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये एका गांजा प्रकरणी पोलिसांनी पैसे घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत सदर माहिती उघडकीस आली होती. या प्रकरणाची दखल कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी गंभीर रित्या घेतली असून याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
बेळगावमधील ‘नो करप्शन’ या नावाखाली सुरु असणाऱ्या ट्विटर अकाउंटवर सदर प्रकरणासंदर्भात ट्विट करण्यात आले होते. या अकाउंटशी अलोक कुमार देखील संलग्न आहेत. यामुळे सदर ट्विट पाहून त्यांनी रिट्विट करत गांजा प्रकरणी चौकशी करण्याची तयारी सुरु केली आहे गुन्हा दाखल होत असल्याचे म्हटले आहे.
याव्यतिरिक्त आज श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनीही पत्रकार परिषदेत उल्लेख केला होता. बेळगावमधील सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांवर खोट्या तक्रारी दाखल करून नाहक त्रास देण्यात येत होता.
FIR is getting registered. Enquiry is being conducted regarding the role of Police Officers & other staff. https://t.co/ZvdqTjPlHc
— alok kumar (@alokkumar6994) January 31, 2023
यामुळे दक्षिण मतदार संघाच्या व्याप्तीत येणाऱ्या काही पोलीस स्थानकामार्फत कशापद्धतीने गांजा प्रकरणे दडपली जातात आणि अशा प्रकरणात पैसे घेऊन पोलीस कशापद्धतीने कानाडोळा करतात याबाबत कोंडुसकर यांनी पोलिसांना धारेवर धरत आरोपही केले होते.
एडीजीपी अलोक कुमार यांनी या आरोपांचीही दखल घेत सदर गांजा प्रकरणी पैसे घेऊन, प्रकरण दडपून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांचीही चौकशी होईल, असे जाहीर केले आहे. आर पी डी परिसर गांजा प्रकरणाची दखल राज्य स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांनी घेतल्याने लवकरच या प्रकरणातील आरोपा बाबत खुलासा होणार आहे.