शिवनीती आणि शिव संस्कार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी महानाट्य हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. खानापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारी शेतकरी जनता हजारोंच्या संख्येने आहे. त्यांना नव्याने शिवचरित्र समजून घेता यावे यासाठी शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन केले असल्याचे भाजप नेते महालक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले.
खानापूर शहराजवळील शांतिनिकेतन शाळेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या दीडशे फूट रुंद आणि साठ फूट उंचीच्या भव्य रंगमंचावर आज सायंकाळी सात वाजता विविध मठाधीशांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महानाट्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले. 10 जानेवारी पर्यंत दररोज सायंकाळी 6 वाजता मराठी प्रयोगाला सुरुवात होणार आहे.
यावेळी बोलताना विठ्ठल हलगेकर म्हणाले, आदर्श हिंदू संस्कृतीचा विसर पडू न देता छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ. छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या जीवनाची वाटचाल करणे आवश्यक आहे.
भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकरगौडा पाटील, बेंगलोर येथील गोसाई मठाचे मंजुनाथ भारती स्वामी, बिळकी अवरोळी मठाचे चन्नबसवदेव महाराज, शंभुलिंग शिवाचार्य स्वामी, आडवी सिद्धेश्वर महाराज,भाजपचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांची भाषणे झाली.
लैला साखर कारखान्याचे एम डी सदानंद पाटील यांनी प्रास्ताविक केले. महानाट्याच्या पहिल्याच दिवशी 20 हजारहून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शविल्याने पहिलाच प्रयोग हाउसफुल झाला.
यावेळी शिवपुत्र महास्वामी, डॉ सुर्यवंशी, मदनकुमार भैरप्पनवर, शिवसिद्ध शिवाचार्य, शंभूलिंग शिवाचार्य स्वामी, डॉ सोनाली सरनोबत, वन निगमचे संचालक सुरेश देसाई, प्रा. बी. एल. मजूकर, किरण येळ्ळुरकर, प्रा. भरत तोपिनकट्टी, जोतिबा रेमाणी, प्रकाश तिरविर, भरमाणी पाटील आदी उपस्थित होते. पिराजी कुराडे यांनी सुत्रसंचलन केले.