बेळगाव लाईव्ह : व्यापाऱ्यांना अधिकाधिक काळासाठी परवाना देण्यासाठी महानगरपालिका नवी मोहीम राबवणार आहे. व्यापारी परवान्याचा कार्यकाळ तीन ते पाच वर्षे करण्यात येणार असून व्यापार परवाना घेणे, दरवर्षी व्यापारी परवान्यांचे नूतनीकरण करणे याबाबतच्या कटकटी संपणार आहेत.
व्यापार परवानाच्या माध्यमातून महापालिकेला मिळणाऱ्या महसुलावर लक्ष केंद्रित करत व्यापाऱ्यांमध्ये जागृती करण्यात आली आहे. महानगरपालिकेला व्यापार परवान्यातून नाममात्र महसूल मिळत होता. व्यापार परवाना संदर्भात महापालिकेने अनेकदा धडक कारवाई देखील केली.
यामुळे केवळ नऊ महिन्यात एक कोटी २० लाखाहून अधिक महसूल पालिकेकडे जमा झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत दोन कोटी रुपयांचा महसूल गाठण्याचे उद्दिष्ट मनपाने ठेवले आहे.
नगर प्रशासन खात्याच्या निर्णयानुसार व्यापारी पाच वर्षांपर्यंतचा परवाना एकाच वेळी घेऊ शकतात. महानगरपालिकेत देखील हा निर्णय लागू असून व्यापाऱ्यांनी एकाच वेळी तीन ते पाच वर्षापर्यंतचा परवाना घ्यावा, यासाठी जागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एकदा व्यापार परवाना घेतल्यानंतर तो दरवर्षी नूतनीकरण करून घ्यावा लागत होता. त्याआधी मालमत्ता कर भरणे बंधनकारक होते. मात्र, महानगरपालिकेच्या नव्या परवाना धोरणामुळे व्यापाऱ्यांना यापुढील काळात परवाना नूतनीकरणाच्या कामाचा ताप होणार नाही.
दीर्घकाळ व्यापार परवान्यासाठी आता व्यापाऱ्यांना मनपाचे उंबरठे झिजवावे लागणार नसून व्यापार परवाना मिळवण्याची सोय ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन माध्यमातून व्यापारी परवाना नूतनीकरण करू शकतात.
मात्र, व्यापाऱ्यांनी तीन ते पाच वर्षापर्यंतचा परवाना घेतल्यास त्यांना अधिक सोयीचे होणार आहे. दीर्घकाळ व्यापारी परवान्यासाठी पथक नेमून जागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय डुमगोळ यांनी दिली.