बेळगाव : आधुनिकीकरणाच्या काळात मुलांची मातीशी नाळ तुटत चालली आहे. मातीशी नाळ तुटल्यानंतर माणसाचं अस्तित्व हरवतं अशीच काहीशी परिस्थिती नव्या पिढीची झाली आहे. पूर्वी मातीत खेळणारी मुले आज एका कोपऱ्यात स्वतःचे असे अस्तित्व निर्माण करून वेगळ्याच विश्वास रमताना पाहायला मिळत आहेत. कॉम्प्युटर, मोबाईल आणि टीव्ही यांच्या स्वतंत्र जगताच वावरणारी मुले आज डिप्रेशनसारख्या आजारांनी ग्रासत आहेत.
मोकळे वातावरण, मैदान, सर्वांशी एकरूप होऊन खेळले जाणारे खेळ, मैदानी खेळ अशा खेळात रमून एकमेकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारणारी मुले आजकाल हरवली असल्याचा भास होत आहे. एकेकाळी लगोरी, विटी-दांडू, गल्ली क्रिकेट यासारख्या खेळांमध्ये रमणारी मुले आज एकोप्याला अधिक पसंती देत आहेत. सामूहिक विश्वापेक्षा त्यांना स्वतःच स्वतंत्र आणि वेगळं विश्व हवंहवंसं वाटू लागलं आहे. एकंदर हि परिस्थिती पाहता या साऱ्या गोष्टी वैद्यकीय दृष्टिकोनातूनही धोकादायक आहेत.
धकाधकीच्या जीवनात घराबाहेर निघणारे पालक, आयटी पार्क सारख्या ठिकाणी काम करणारे पालक यामुळे घरातील मुलांकडे काहीसे दुर्लक्ष करतात. वेळेच्या बंधनामुळे कित्येक पालक आपल्या मुलांना म्हणावा तितका वेळ देऊ शकत नाहीत. दिवसभर कंटाळून, थकून आलेल्या पालकांकडून सहजपणे आपल्या मुलांच्या हातात मोबाईल दिला जातो. टीव्ही, इंटरनेटच्या आहारी गेलेली मुले आज मैदानात येणं विसरली आहेत. त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आहे. अशावेळी पालकांना आता वेगळ्या समीक्षेला तोंड द्यावं लागत आहे.
आधुनिकीकरण, तंत्रज्ञान या साऱ्या गोष्टींच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या पिढीचे मैदानाशी, मातीशी असलेले नाते तुटत चालले आहे. बेळगावमध्ये बरीचशी मैदानं आज सुनी झाली आहेत. सुट्ट्यांच्या दिवशी एकेकाळी भरून जाणारी मैदानेही आज मुलांच्या प्रतीक्षेत आहेत. मुलांशी मातीशी असलेली नाळ तुटण्यापूर्वी त्यांना पुन्हा एकदा मैदानाकडे वाळविणे गरजेचे आहे. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे अत्यंत आवश्यक आहे.
इंटरनेट, टीव्ही, मोबाईल या गोष्टींच्या आहारी गेलेली मुले एकलकोंडी तर झाली आहेत परंतु वागण्या-बोलण्यातही सुमार होत चालली आहेत. नात्यांची आपुलकी, प्रेम, जिव्हाळा या गोष्टींऐवजी व्यावहारिक दृष्ट्या मुलांची ओढ अधिक वाढत चालली आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरी वाद-वडिलांचा धाक असायचा. आजी-आजोबांच्या सानिध्यात वावरणाऱ्या आणि वाढणाऱ्या मुलांना योग्यवेळी, योग्यपद्धतीने सर्व गोष्टी समजायच्या. मात्र आता विभक्त आणि छोट्या कुटुंबाची क्रेझ वाढली असून घरी वडीलधारी मंडळी नसल्याने मुलांना योग्य मार्गदर्शनही मिळणे दुरापास्त झाले आहे. मुलांना या सर्व आवश्यक गोष्टींचा वारसा देण्यात आई-वडील कमी पडल्यामुळेही हे चित्र पाहायला मिळते आहे.
मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात लोप पावत चाललेल्या मातीतील खेळाचा मनमुराद आनंद घेण्याची संधी आज खूप कमी मुलांना मिळते. गाव सोडून शहराकडे घर वसविलेल्यांना तर मैदानं पाहणेही कठीण बनले आहे. मात्र अशावेळी आपल्या मुलांना ग्रामीण जीवनशैलीची ओळख करून दिल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य अबाधित राहील.
पालकांनी सामंजस्याने आपल्या मुलांना जीवनाचा सार समजावून सांगितल्यास एकलकोंड्या वृत्तीतून बाहेर येण्यास मुलांना मदत होईल. मागील दोन वर्षात कोविडमुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. आधीच टीव्ही आणि मोबाईलच्या आहारी गेलेली मुले वाढत्या ऑनलाईन गोष्टींमुळे मैदानी खेळ खेळण्याच्या सवयींपासून दूर गेली आहेत. अशा परिस्थितीत त्यांना घराबाहेर पडून पुन्हा मैदानात खेळण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे.