बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराचा केंद्रबिंदू असलेल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी चौकातील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे बुरुज, तटबंदी, तोफा, श्री भवानी मातेचे शिल्प, श्री शंभो चौथरा या सर्व गोष्टी गडकोट किल्ल्यांचा अभ्यास करून विचारपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने बनविण्यात आल्या आहेत, अशी माहिती या स्मारकाचे स्थापत्य अभियंता मुरली अर्जुन बाळेकुंद्री यांनी दिली.
शहरातील ध. संभाजी चौक येथील धर्मवीर छ. श्री संभाजी महाराज मूर्ती परिसराच्या सुशोभीकरणासंदर्भात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना अभियंता बाळेकुंद्री यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले की, या स्मारकाची संकल्पना जेंव्हा आमच्यासमोर मांडण्यात आली त्यावेळी सर्वप्रथम स्मारकाची जागा शाश्वत असली पाहिजे असे आम्ही आमदार ॲड. अनिल बेनके यांना सांगितले. तेंव्हा त्यांनी तत्क्षणी परवानगी दिली.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराजांचे सुपुत्र छ. संभाजी महाराज यांचे स्मारक कसे असावे याबाबत गहन चर्चा आणि विचार विनिमय झाला. त्यानंतर सध्याच्या स्मारकाची कल्पना सुचली. त्यातूनच अभ्यासपूर्वक ‘श्री शंभो’ या नावाने महाराजांच्या स्मारकाचा 13 कोनी चौथरा घडला. ड्रोन कॅमेऱ्याने आकाशातून पाहिल्यास हा चौथरा पवित्र शिवलिंगाप्रमाणे दिसतो हे विशेष होय. महाराजांच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला किल्ल्याचे बुरुज आहेत. हे बुरुज 10 कोनी असून त्याच्या बाजूला तटबंदी आहे. वरच्या अंगाला जंगा आणि तोफा आहेत.
स्मारकाच्या 25 फूट उंचीच्या बुरुजाच्या ठिकाणी वर चढण्यासाठी किल्ल्याच्या पायऱ्या आहेत. एकंदर गडकोट किल्ल्यांचा अभ्यास करून हे स्मारक उभारण्यात आले आहे. चौथर्याची परिक्रमा संपूर्ण दगडात असून आतील संपूर्ण फरसबंदी दगडाची आहे. पायऱ्या आणि वर चढल्यानंतर महाराजांच्या मूर्तीच्या पार्श्वभूमीवर स्मारकाच्या भिंतीवर अष्टभुजा श्री भवानी मातेचे शिल्प आहे. मुंबईचे मूर्तिकार सतीश वालावलकर यांच्या संकल्पनेनुसार हे समोर सिंह असलेले हातात आयुधे घेतलेल्या अष्टभुजा श्री भवानी मातेचे शिल्प अल्पावधीत साकारण्यात आले आहे.
सदर स्मारकासाठी वापरण्यात आलेले दगड हे बेळगाव परिसरातील नसून ते महाराष्ट्रातील गारगोटी, गडहिंग्लज आदि भागातून शोधून चांचणी करून वापरण्यात आले आहेत. स्मारकाच्या बुरूजावरील तोफा मोगली नसाव्या त्या मराठा तोफा असाव्यात आमदार बेनके यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यानुसार बेळगावचे कारागीर विनायक नेसरकर यांनी या तोफांसह लहान शंभू महाराज यांची मुद्रा आणि त्यांची मूर्ती अतिशय सुरेखरित्या साकारली आहे असे सांगून मूर्तिकार विनायक निसरकर यांनी घडविलेल्या या प्रतिकृतींमुळे खऱ्या अर्थाने या स्मारकात जीव आला आहे, असे स्मारकाचे स्थापत्य अभियंता मुरली बाळेकुंद्री यांनी सांगितले.
स्मारक सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनीही या स्मारकाची संकल्पना कशाप्रकारे प्रत्यक्षात उतरली याची थोडक्यात माहिती दिली. स्मारकावरील श्री भवानी मातेच्या शिल्पाबद्दल बोलताना ज्या भवानी मातेने छत्रपती शिवरायांना दृष्टांत दिला त्या मातेचे शिल्पच वरदहस्त असल्याप्रमाणे महाराजांच्या मूर्ती मागे स्मारकावर असावे, अशी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, बजरंग दलाचे विजय जाधव आदी सर्वांची इच्छा होती. त्यानुसार सर्वानुमते स्मारकावर अष्टभुजा श्री भवानी मातेचे शिल्प साकारण्यात आले आहे. एकंदर शहरातील विविध संघटनांना विश्वासात घेऊन हे संपूर्ण स्मारक उभारण्यात आले आहे. शिवाय या स्मारक उभारणीचे संपूर्ण श्रेय आमदार ॲड. अनिल बेनके यांना जाते, असे त्यांनी सांगितले.
भव्य आणि सुशोभीकरण करण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा शनिवार 28 जानेवारी रोजी भारत सरकारचे माहिती आयुक्त व जेष्ठ पत्रकार श्रीमंत उदय माहूरकर, छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज, बहिर्जी नाईक व हंबीरराव मोहिते यांचे वंशज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून तमाम शिवसैनिक आणि नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्मारक सुशोभीकरण समितीने केले आहे.