बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम कायदा व सुव्यवस्था पुरविण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलीस विभागाने महत्वाचा उपक्रम सुरु केला असून पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांच्या माध्यमातून ‘फोन-इन’ या अभिनव उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नागरिकांशी पोलीस अधीक्षक त्या-त्या भागातील अडचणी आणि समस्यांसंदर्भात चर्चा करून मते जाणून घेतात. पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाला विविध भागातून उत्तम प्रतिसाद मिळत असून आजच्या कार्यक्रमात विविध ठिकाणाहून ५१ जणांनी संपर्क साधून आपल्या भागातील समस्यांसंदर्भात चर्चा केली आहे.
स्थानिक पातळीवरील समस्या आणि गुन्ह्यांबाबत अनेक ठिकाणच्या नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना माहिती दिली असून नागरिकांच्या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
आजवर आयोजित केलेल्या ‘फोन इन’ कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात ७२, दुसऱ्या टप्प्यात ६५, तिसऱ्या टप्प्यात ५८, चौथ्या टप्प्यात ६२, पाचव्या टप्प्यात ५६ आणि आज आयोजिलेल्या सहाव्या टप्प्यात ५१ जणांनी फोन करून आपल्या समस्या पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचविल्या आहेत.