बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेली बायसिकल शेअरिंग योजना अखेर कार्यान्वित झाली असून काल मंगळवारी शहरातील 20 डॉकयार्ड पैकी 3 डॉकयार्डच्या ठिकाणी शहरवासीयांना सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
बेळगावातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना पूर्वी शहरातील बायसिकल शेअरिंग योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. मात्र आता काल मंगळवारी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान, टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो व पहिले रेल्वे फाटक या तीन ठिकाणच्या डाॅकयार्डमध्ये सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच कोल्हापूर सर्कल येथील डॉकयार्डमध्ये सायकली उपलब्ध असणार आहेत.
शहरातील प्रत्येक डॉकयार्ड जवळ कन्नड व इंग्रजी भाषेत माहिती फलक लावून तेथील सायकलींचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. शहरातील बायसिकल शेअरिंग योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना ‘याना’ ॲप डाऊनलोड करून घ्यावा लागेल. त्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करून सायकल अनलॉक करावी लागणार आहे. प्रवास पूर्ण झाल्यानंतर जेथे सायकल ठेवली जाईल, तेथे सायकल लॉक करावी लागेल. तसेच मोबाईल ॲपमध्ये जाऊन ‘एंड राईड’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
मात्र नागरिकांना लगेचच ही सर्व माहिती आत्मसात करता येणार नाही, यासाठी ठेकेदारांनी डॉकयार्डमध्ये तैनात केलेल्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मार्गदर्शन मिळणार आहे. बायसिकल शेअरिंग योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहरात 20 ठिकाणी डॉकयार्ड तयार करण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यात तीन वेगवेगळ्या प्रकारच्या 300 सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन भविष्यात या योजनेचा विस्तार केला जाणार आहे.