बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आतापासूनच मतदार संपर्क अभियानाला सुरुवात केली असून काँग्रेस पक्षाने प्रजाध्वनी यात्रेला सुरुवात केली आहे. प्रजाध्वनी यात्रा हि काँग्रेसची निवडणुकीसाठी स्टंटबाजी आहे, असा आरोप बेळगावमधील भाजप नेत्यांनी केला आहे.
बेळगावमध्ये खासगी हॉटेलमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आ. अनिल बेनके यांनी काँग्रेसच्या प्रजाध्वनीवर टीका केली. निवडणुकीआधी तीन महिने जागे होऊन अचानक काँग्रेस पब्लिसिटी स्टंट करतो. आणि अचानक गायब होतो. काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीदरम्यान होणारे यात्रा-कार्यक्रम भाजप दर आठवड्याला करतो.
वर्षभर लोकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. जनतेला हे माहित आहे म्हणून जनतेचा भाजपाला मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे अशा राजकीय स्टंटबाजीचा भाजपवर कोणताही फरक पडत नाही, असा टोला आमदार अनिल बेनके यांनी लगावला.
बेळगाव उत्तर मतदार संघात वाटण्यात येणाऱ्या भेटवस्तूंबाबतही अनिल बेनके यांनी टोलेबाजी केली असून आपल्याला भेटवस्तू देण्याची गरज नसून आपण निवडून आल्यानंतर लगेच जनतेच्या प्रश्नांवर, समस्यांवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही केलेला विकास पडताळून पाहायचा असेल तर गेल्या ५ वर्षात झालेल्या शहराच्या कायापालटाबाबत विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, भाजप राज्य प्रवक्ते एम. बी. जिरली आदी उपस्थित होते.