Friday, January 24, 2025

/

निवडणुकीच्या तोंडावर प्रलोभनांसाठीही रस्सीखेच!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : विधानसभा निवडणुका येत्या २-३ महिन्यात होऊ घातल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजवर रस्त्यावर हिंडणाऱ्या मतदाराला ‘मतदार राजा’चा मान मिळणार आहे. इतकेच नाही तर त्याला सिंहासहनावर चढविण्यासाठी राजकीय पक्षाची लगबग सुरु झाली आहे.

वेगवेगळ्या स्पर्धा भरविणे, ‘इव्हेन्ट’ आयोजित करणे, विविध ‘स्कीम’ सुरु करणे अशा विविध पद्धतीने मतदाराला प्रलोभने दाखवत मतदाराला आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून आणि राजकीय पक्षाकडून शक्तिप्रदर्शनाचे काम सुरु आहे. क्रिकेट सामने, कब्बडी सामने, पतंग उडविणे, फ्रिज, मोफत डब्बे, भांडी, दिमाखात वाढदिवस साजरा करणे यासारख्या विविध पद्धतीने उमेदवारावर छाप पाडण्यासाठी उमेदवारांचा खटाटोप सुरु झाला आहे.

साडेचार वर्षे स्तब्ध असलेली सरकारी, राजकीय यंत्रणा अचानक ‘ऍक्शन’ मोडवर आली आहे. विकासकामांचा वेग दुप्पट झाला आहे. रस्ते, गटारी किंवा इतर दुरुस्तीची कामे संबंधित लोकप्रतिनिधीनाधीच इच्छुक उमेदवाराकडून पूर्ण करण्यासाठी धडपड सुरु आहे. जनतेकडे करुण नजरेने पाहणारी त्यांची दृष्टी आता स्नेहार्द आणि प्रेमळ नजरेने पाहत आहे.

प्रत्येक माणसाचे दुःख त्यांच्या मनात साठत चालले आहे. मतदारांचा कळवळा आणि त्यांच्या बारीकसारीक अडचणींची अचानक सर्वांना आठवण होऊ लागली आहे. यामुळे पाठीमागून काठ्या घेऊन चालणाऱ्या मतदारांना आता मखमली पायघड्यांवरून चालल्याचा भास होत आहे. आपल्याला देखील महत्व आहे! या गोष्टीचे आत्मभान आता मतदारांना येऊ लागले आहे. मात्र अवघ्या साडेतीन-चार महिन्यांसाठी पदरी आलेले हे सुख कितपत टिकून राहणार याची शाश्वती मात्र मतदार राजाला नाही!

मतदारांप्रमाणेच कार्यकर्त्यांनाही सुगीचे दिवस आले आहेत. एरव्ही साहेबांच्या आणि मॅडमच्या वाहनामागून फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची चांगलीच बडदास्त होऊ लागली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी २-४ महिन्यांचा ‘पार्ट टाइम जॉब’ स्वीकारल्याचे चित्र आहे. चहापासून, नाश्ता-जेवण आणि इतर ‘सोयी’ची दखल घेतल्याने अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या घरात देखील २-४ महिन्यांची रजा टाकली आहे!

पूर्वी साहेबाच्या वाहनामागे आशाळभूत नजरेने कार्यकर्ते आता साहेबांच्या कंपाउंडच्या आत टाकलेल्या खुर्च्यांवर दिसू लागले आहेत. शुभ्र आणि नीटनेटके कपडे, उत्तम राहणीमान अशा आवेगात सध्या कार्यकर्ते वावरू लागले आहेत. कार्यकर्त्यामधील उत्साह आणि चैतन्य पाहता कार्यकर्त्यांना सोनेरी दिवस आल्याचे चित्र आहे शिवाय आतापासूनच कार्यकर्त्यांनीही साहेबांची टिमकी वाजवायला सुरुवात केली आहे. मात्र हे सुख क्षणिक आहे, याचे भान कार्यकर्त्याला येणेही गरजेचे आहे.Election mode dabba sarees

निवडणुकीच्या तोंडावर अळंबीसारखे उगवलेले नेते आणि या नेत्यांच्या मागे फिरणारे कार्यकर्ते! यामध्ये कायमस्वरूपी कार्यकर्ता म्हणूनच राहणाऱ्या कार्यकर्त्याची केविलवाणी धडपडही सुरु झाली आहे. साहेब बदलत राहतील पण कार्यकर्त्यांचे पेव मात्र सगळीकडे फुटले आहे. अनेक कार्यकर्ते अशा विविध निवडणुका प्रत्येक ६ महिन्याला याव्यात अशी आशा ठेवून आहेत. यामुळे निवडणुकीच्या काळात ठराविक दिनक्रम पक्का होईल, आणि पोटापाण्याची व्यवस्थाही होईल! हि भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये आहे.

मतदार आणि कार्यकर्त्यांसह खेळाडूंनाही चांगले दिवस आले आहेत. गेले कित्येक दिवस दिमाखात वाढदिवस साजरा करुन त्याचा भलामोठा ‘इव्हेन्ट’ करुन त्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करू पाहणाऱ्या आणि यातच धन्यता मानणाऱ्या उमेदवारांच्या सुपीक डोक्यातून नवनव्या स्पर्धांच्या कल्पना बाहेर येत आहेत. बेळगावमध्ये अनेक स्पर्धांचे पेव फुटले आहे.

निवडणुकीच्या सामन्यापूर्वी सुरु असलेला हि तालीम, आणि कार्यकर्ते – सामान्य नागरिक आणि नेते मंडळी अशा तिहेरी सांदडीत सापडलेल्या सामान्य नागरिक मात्र हवालदिल आहे. निवडणुका येतील आणि जातील. पण सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न बदलणार नाही. त्याच्या आयुष्यावर फारसा असा फरक पडणार नाही. महागाईच्या या जमान्यात निवडणुकीचा आपल्याला फायदा काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.