Thursday, January 23, 2025

/

समृद्ध वृक्षसंपदा जतन करण्यासाठी हवा बेळगावकरांचा पुढाकार

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : निसर्गसौंदर्याने आणि वनश्रीने बहरलेले बेळगाव समृद्ध आहे. बेळगाव आणि बेळगावकरांसाठी वनराईचा अभ्यास हा संशोधनाचा विषय आहे. वनश्रीने नटलेल्या आणि समृद्ध असलेल्या बेळगावमध्ये अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. जुनाट वृक्ष, फळ आणि फुल झाडांनी बहरलेल्या परिसरातील वनराईचे वृद्धीकरण होणे आवश्यक आहे.

बेळगाव हा असा परिसर आहे जिथे वनराईने नटलेला ‘व्हॅक्सिन डेपो’ सारखा परिसर आहे. बेळगाव शहरातील एकूण ३३ टक्के जमीन हि छावणी परिषदेच्या अखत्यारीत आहे. चोहोबाजूंनी पसरलेली हिरवळ हि बेळगावची खासियत आहे. हि हिरवळ ब्रिटिश काळापासून टिकून आहे. बेळगावच्या एकंदर वृक्ष संस्कृतीला योग्यपद्धतीने जपणे आणि संवर्धन करणे आवश्यक आहे.

आज बेळगावमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक वृक्षांची माहिती बेळगावकरांना नाही. केवळ हिरवळीचा विचार न करता आपल्या आसपास असलेल्या वृक्षांचा आपल्याला कोणता फायदा होतो याबद्दल अभ्यास करणेही महत्वाचे आहे. आपल्या आसपास झाडांची लागवड करताना ती झाडे आपल्याला कितपत उपयोगी पडतील, झाडांच्या माध्यमातून निसर्गासह आपल्याला कोणता फायदा होईल याचाही विचार होणे आवश्यक आहे.

आज बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात गुलमोहोर वृक्ष आढळतात. मात्र यासारखी झाडे हि कमकुवत असतात. याचप्रमाणे अनेक विदेशी झाडांची लागवडही करण्यात आली आहे. मात्र हि झाडे केवळ कमकुवतच नाही तर ती वातावरणासाठीही हानिकारक ठरू शकतात. या झाडांमुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो शिवाय म्हणावी तशी या झाडांची उपयुक्तताही नाही.

वन्यजीव अभ्यासक, लेखक मारुती चित्तमपल्ली यांनी आपल्या पुस्तकामध्ये झाडांच्या लागवडीसंदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली आहे. शहरात, गावात, बांधावर, माळरानावर कोणती आणि कशापद्धतीची झाडांची लागवड असावी याबद्दल मार्गसूची सांगितली आहे. अशा मार्गसूचीचा नीट अभ्यास करून झाडे कशापद्धतीची असावीत, नवीन झाडांची लागवड कशापद्धतीची असावी, उपलब्ध असलेल्या झाडांची कशापद्धतीने निगा घ्यावी, अमानुषपणे होणारी वृक्षतोड थांबवावी याकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरविणे महत्वाचे आहे. जमिनीची धूप थांबेल, माती वाहून जाणार नाही, जलसंवर्धन मोठ्या प्रमाणात होईल यासाठी वृक्षसंस्कार करणे, वृक्षारोपण करताना उपयुक्त आणि देशी झाडांची निवड करून त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या आसपास असलेली वृक्षवल्ली हि राष्ट्रीय संपत्ती आहे हे जाणून वृक्षांचे जतन, संगोपन आणि वृद्धीकरण केले पाहिजे.Bgm tress save

मध्यंतरी समाजसेवी संस्था आणि प्रशासनाच्या सहकार्यातून वृक्षसंवर्धनासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. झाडांची अमानुषपणे होणारी कत्तल थांबवून झाडांचे स्थलांतर करण्यात आले. मात्र हि मोहीम सध्या थंडावली असून पुन्हा अनेक ठिकाणी वृक्षतोड होत असल्याचेही निदर्शनात येत आहे. बेळगावची समृद्ध वृक्षसंस्कृती जोपासण्यासाठी पुन्हा एकदा प्रशासनाने प्रत्येक नागरिकांच्या हातात हात मिळवून बेळगावची निसर्गसंपदा जतन करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. बेळगावच्या निसर्गसंपदेमुळे येथे थंड वातावरण असते. यासाठीच बेळगावला दुसरे महाबळेश्वर म्हटले जाते.

मात्र शहरीकरणाच्या नावाखाली बेळगावचे होत असलेले विद्रुपीकरण आणि बेसुमार वृक्षतोड त्याचप्रमाणे अनियोजित वनखात्याची देखभाल यामुळे बेळगावची मूळ ओळख बाजूला हटत चालली आहे. बेळगावची ओळख हि कोणत्याही निकषावर दुसऱ्या क्रमांकावर न होता बेळगावची स्वतःची असलेली स्वतंत्र ओळख जपणे आणि यासाठी प्रत्येकाने हातभार लावणे अत्यावश्यक आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.