*कर्नाटक विधानसभेचे वारे वाहायला लागलेत. निवडणूक जाहीर झाली नसली तरी ती होणार आहे याची माहिती मिळाल्याने सगळेच कामाला लागलेत आणि आमची समिती कुठे हाय? कुठे पर्यंत पोचली आणि काय करणार हाय….* याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सातत्याने प्रभावी आणि त्यानंतर पराभवी भूमिकेत सद्या असलेली समितीची वाटचाल पाहिली की आता कुणीही समितीला, तिच्या नेत्यांच्या हेकडीला आणि बेकीच्या वातावरणाला कुणीही टेकन फॉर ग्रांटेड घ्यावे अशी सद्या परिस्थिती आहे. समिती नेते काय करणार याची चिंता सामान्य मराठी माणसाला आहे. राष्ट्रीय पक्षांना अजिबात नाही….. कारण आधीच डिव्हायडेड होऊन समितीला डेड केलेल्या नेत्यांना आणखी डिव्हाईड करून रुल करण्याचे त्यांचे नियोजन पक्के झाले आहे.
कुणी आपला खजिना जपण्यासाठी, कुणी आपले अस्तित्व जपण्यासाठी कधीच राष्ट्रीय पक्षांच्या गळाला लागलेला आहे. समितीशी गद्दारी केलेली खपवून घेणार नाही…. असे म्हणणारे अनेक रथी महारथी आपला स्वाभिमान आपल्या स्वार्थापुढे गहाण टाकून सर्वसामान्य मराठी माणसाच्या अस्मितेचे लोणचे घालू पाहात आहेत. यामुळे समितीची दहशत आणि दबदबा हाय काय न्हाय? हे शोधत फिरण्याची वेळ सामान्य मराठी माणसावर आली आहे.
कधीकाळी 11 आमदारांचा इतिहास सांगणारी समिती…. नंतर 7 काही वर्षांनी पाचावरून दोन आणि आता शून्य आमदार संख्येवर आली आहे. असे का झाले? असा प्रश्न केल्यावर आप्पा, तात्या, साहेब आणि मामांची गुळगुळीत उत्तरे तयारच आहेत. कर्नाटकाने मतदारसंघ फोडले…. आमची माणसे फोडली…. संघटना तोडली अशी नेहमीची उत्तरे दिली की यांनी बेकिने केलेला पराभव पुसला जाईल अशी त्यांची मानसिकता झाली आहे. कोणीही धड नाही आणि समितीचे धड त्यांनी वेगळे केले आहे. यामुळे राष्ट्रीय पक्षांचे लोक आता समितीला घाबरत नाहीत. त्यांनी आपले नियोजन फिक्स केले आहे. कुठल्या मतदारसंघात कुणाकडे रसद द्यायची आणि कोण कुणाच्या कुठल्या मुद्द्यावर विरोधात आहे हे समितीपेक्षा आता राजकीय पक्षांना चांगले माहीत झाले आहे. जुन्या निवडणुकीत एकाने आपला पराभव केला म्हणून विधवा झालेली नेतेमंडळी दुसऱ्या कुणालाही सुखाचा संसार करू न देण्याच्या शपथा घेऊन कामाला लागली आहेत. त्याचे नाव पुढे आले तर कुणाकडे जायचे आणि त्याला पाडवयाला कसे प्रयत्न करायचे या खेकडा प्रणालीत अनेक पराभवाचे आराखडे आताच तयार झाले आहेत.
आमचे मतदारसंघ फोडले पण मतदार संख्या विभागली तरी ती दोन दोन उमेदवार देऊन आणखी कशी विभागायची याची कारस्थाने मराठी माणसाला नवी नाहीत. आमची माणसे फोडली म्हणणाऱ्यांनी तर स्वतःच्या दोन्ही हातांनी स्वतःचीच मुस्कटे फोडून घ्यायला हवीत. कारण त्यांनी वर्चस्वाच्या लढाईत माणसे जपलीच नाहीत. चला गेलेल्या किती सेनापतींनी परत आणले हो? शिवरायांचे नाव सांगून, त्यांची नाटके घडवून समाजाला आदर्श दाखवू पाहणाऱ्यांना शिवरायांनी घालून दिलेला नेताजी पालकर यांच्या उदाहरणाचा इतिहास कसा काय दिसत नाही…. चला गेले ते गेले…. जे कधीच तुमचे नव्हते ते येतो म्हणत असतील तर तुम्ही किती वेळा पायघड्या घातल्या हो…. तुमचे नसले तरी वर्चस्व सिद्ध करत समाजात गब्बर असलेले असे किती जण समिती बळकट करण्यासाठी तुम्ही आपलेसे केले हो? लाज वाटली पाहिजे नसती कारणमीमांसा करणाऱ्या नेत्यांना…
आज समितीची शोकांतिका पाहिली की ते हुतात्मे भर थंडात ही पेटून उठत असतील…. म्हणूनच या निवडणुकीच्या तोंडावर तरी समितीचा रुतबा कायम ठेवण्यासाठी नेत्यांनी आपले स्वार्थ सोडले पाहिजेत. नाहीतर समिती म्हणजे काळ्या दिनाला ओरडा करून नंतर नेत्यांची पाकिटे घट्ट करणारी संस्था इतकीच ओळख शिल्लक राहण्याची आज जी भीती निर्माण झाली आहे ती कायमची मराठी माणसाच्या मानगुटीवर बसायला वेळ लागणार नाही.
समितीने मोठेपण दिले, पदे दिली, मान दिला, पैसा दिला पण समितीला यांनी काय दिले? पराभव…..? यापेक्षा यांची लायकी ती काय….? भारत स्वतंत्र झाल्यावर नागरिकांच्या भावनांशी खेळत दुसरा स्वातंत्र्य लढा उभारणाऱ्या मंडळींनी आपली चांगली भरभराट करून घेतली आहे. आता बलाढ्य राष्ट्रीय पक्षांचे एजंट बनण्यापेक्षा त्या लढ्याशी प्रामाणिक राहण्याची खरी गरज आहे.
समितीचे अजून उमेदवार ठरले नाहीत. निवडणूक संपल्यावर गेली पाच वर्षे जनतेच्या प्रश्र्नांशी देणे घेणे नाही. आता जर मनात वाटतील ते उमेदवार दिले तर त्यांना जनता स्वीकारेल असे म्हटले तर चालेल कसे? आणि हे सारे जर पराभवाचे नियोजन करून होत असेल तर त्याला म्हणायचे काय? ही परिस्थिती बदलायला हवी आहे. जिंकणारच असा चंग बांधून त्वेषाने लढणारी समिती आज जनतेला हवी आहे….. ती मिळेल ही अपेक्षा आहे….. नाहीतर चारी मुंड्या चीत होत पुढची पाच वर्षे नेते गायब होतील आणि जनता भोगत राहील त्यांनी केलेल्या पापांची फळे….
आज समितीला राजकीय पक्षांच्या दावणीला नेऊन बांधलेल्या प्रत्येकाने याचा प्रामाणिकपणे विचार करावा…. पराभव झाल्यावर करण्यापेक्षा आत्ताच आत्मचिंतन करावे ही प्रामाणिक इच्छा आहे. समितीकडून झालेल्या चुकांची उजळणी केलीच पाहिजे., कारण चुकातून माणूस शिकत जातो आणि समितीला आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे. या आत्मपरीक्षणाच्या वाटा कुठे आहेत हे सांगण्याची आता गरज आहे……..क्रमशः