बेळगाव : बेळगावकर खवय्यांसाठी रोटरी क्लबच्या वतीने अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील विविध प्रांतातील १८० हुन अधिक स्टॉल्स अन्नोत्सवात सहभागी झाले आहेत. बेळगावकर खाद्यप्रेमींसाठी रोटरी क्लबने दिलेल्या पर्वणीला बेळगावकरांचा मोठा प्रतिसाद लाभात आहे.
गेल्या ८२ वर्षांपासून बेळगावमध्ये रोटरी क्लबच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अविनाश पोतदार हे अध्यक्ष झाल्यानंतर गेल्या २५ वर्षांपासून अन्नोत्सवाची परंपरा सुरु करण्यात आली असून यंदा मोठ्या प्रमाणात अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अन्नोत्सवाची परंपरा खंडित झाली होती. मात्र यंदा सावगाव रोड येथील अंगडी महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य प्रमाणात अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
अन्नोत्सवाला जाणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. शिवाय याठिकाणी पोहोचण्यासाठी रिक्षा आणि बस सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सीपीएड मैदानावर भरणाऱ्या अन्नोत्सवात भेट देणाऱ्या नागरिकांना पार्किंगसह अनेक असुविधा निर्माण व्हायच्या. यासाठी यंदा भव्य पार्किंग सुविधा, प्रथमोपचार आणि आवश्यक सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल अन्नोत्सवात असून नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. बेळगाव जिल्ह्यासह १८ विविध राज्यातील नागरिकांचा या अन्नोत्सवात सहभाग आहे. अन्नोत्सवाच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीचा समाजाभिमुख उपक्रमासाठी वापर केला जातो. रोटरी इंटरनॅशलचाही यामध्ये मोठा सहभाग आहे.
सुरुवातीच्या काळात काही मोजक्या स्टॉल्सचा अन्नोत्सवात सहभाग होता. मात्र दरवर्षी नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून हि संख्या आता २०० च्या आसपास पोहोचली आहे. यंदाच्या अन्नोत्सवात गोवा, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, गुजरात अशा विविध ठिकाणचे स्टॉल्स सहभागी झाले आहेत. प्रत्येकाला विविध प्रांतात जाऊन भेट देऊन तेथील खाद्यसंस्कृती अनुभवण्याची संधी मिळत नाही.
यासाठी रोटरी क्लबच्या वतीने बेळगावकरांसाठी हि विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रविवारी अन्नोत्सवाचा शेवटचा दिवस असून बेळगावकरांनी अन्नोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.