बेळगाव लाईव्ह : ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरदेखील आजही भारतातील हजारो लोक उपासमारीने मृत्युमुखी पडतात. एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात व्यस्त आहे.
आणि दुसरीकडे आजही कित्येकांना भीक मागून आपला उदरनिर्वाह करावा लागतो! हि देशाच्या स्वातंत्र्याची अवहेलनाच म्हणावी लागेल. ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होऊन ज्यापद्धतीने भारत स्वतंत्र झाला आता तशाच पद्धतीने भारताला गरिबी मुक्त आणि समान नागरिकत्व मिळवून देण्यासाठी काही धर्मादाय संघटना पुढाकार घेत आहेत.
बेळगावमध्ये अलीकडेच स्थापन झालेली ‘डियरहुड फाउंडेशन’ हि संस्थाही त्यापैकीच एक आहे. सध्या सोशल मीडियावर या संस्थेतर्फे जारी केलेला एक व्हिडीओ वायरल होत आहे. गरजूंच्या, भुकेल्यांच्या, निराधारांच्या, दुर्बलांच्या मदतीसाठी माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेत ‘नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन’ या तत्वखाली हि संस्था कार्यरत आहे.
कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अंतर्गत नोंदणीकृत असलेली हि संस्था दुर्बल, निराधार आणि गरजूंसाठी अन्न, निवारा आणि कपडे यासारख्या मूलभूत सुविधा उपलबध करून देण्यात तत्पर आहे. कोणत्याही प्रकारच्या देणग्या न मिळवता खऱ्या अर्थाने मुळापर्यंत जाऊन मदत करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन हि संस्था कार्यरत आहे.
व्यसनाधीनता ही एक समाजाला लागलेली कीड आहे. व्यसनामुळे आज अनेक लोक क्रूर होत चालले आहेत. नशापान करण्यासाठी भीक मागणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. याच प्रकारे भिक्षुकांची माफिया टीम देखील देशातील एक मोठी समस्या बनली असून या माध्यमातून मानवी तस्करी होत असल्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत.
या संस्थेने ‘फूड कार्ट’ नावाची नवी संकल्पना राबविली असून या माध्यमातून पैसे नाही तर केवळ अन्न दान करून भुकेल्यांची भूक शमवण्यात येत आहे. फूड कार्टच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण न करता पीव्हीसी कार्डप्रमाणे एक कार्ड भुकेल्यांना देण्यात येत आहे. ज्याठिकाणी या संस्थेची भागीदारी असेल त्याचठिकाणी या कार्डचा वापर करून अन्न खाता येणार आहे. यामुळे पैशाचा गैरवापर होण्यावर आला बसणार आहे.
शिवाय गरजूंना योग्य अन्नदेखील मिळणार आहे. बेळगावच्या ऑटोनगर परिसरात हि संस्था कार्यरत असून गरजूंना अशा पद्धतीने थेट मदत करावयाची असल्यास +९१ ७६७६७ ११६३६ या क्रमांकावर संपर्क साधावा. या संस्थेने राबविलेल्या या नाविन्यपूर्ण कल्पनेचा समाजातील गरजूंना नक्कीच फायदा होईल, अशी आशा आहे.