बेळगाव लाईव्ह : आजकाल जगभरात विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यक, शिक्षण क्षेत्र तसेच सेवा आणि उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. या धर्तीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नोकरीसाठी इच्छुकांनी वेळोवेळी आपले कौशल्य विकसित करून निवडलेल्या क्षेत्रात उच्च पदे मिळवावीत, असे आवाहन केले.
कर्नाटक कौशल्य विकास महामंडळाच्या वतीने कौशल्य विकास उद्योजकता, उपजीविका, औद्योगिक प्रशिक्षण आणि रोजगार आयोगाच्या वतीने मराठा मंडळ कला, विज्ञान आणि गृह अर्थशास्त्र महाविद्यालयात सर्वांसाठी उद्योग अभियानांतर्गत आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
विजापूर जिल्ह्य़ात कन्नड माध्यमात शिकूनही सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच नागरी सेवेसारखे उच्च पद मिळवू शकलो, सरकारी आणि खाजगी कंपन्यांमध्ये अनेक नोकऱ्या मिळाल्या. परदेशात जाण्याची संधी असतानाही मी माझे स्वप्न म्हणून नागरी सेवांची निवड केली, असे स्वतःचे उदाहरण जिल्हाधिकाऱ्यांनी देत विद्यार्थीदशेनंतर आपले काम, पद याबरोबरच आपले नाव महत्त्वाचे ठरते. नोकरी किंवा व्यवसाय ही तुमची ओळख बनते. त्यामुळे आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर नोकरीची चांगली संधी मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले.
या रोजगार मेळाव्यात एकूण ३८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. रोजगार मिळविण्यासाठी ३५०० जणांनी नोंदणी केली आहे. प्रत्येकाला त्यांच्या कौशल्याच्या आधारे नोकरी मिळू शकते. प्रत्येकाला नोकरी मिळाली नाही तरी अनुभव मिळेल. रोजगार मेळावे कालांतराने कौशल्य विकासासाठी उपयुक्त ठरतात, असे मत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा कोषागाराचे सहसंचालक सुरेश हल्याळ, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी डॉ.बसवप्रभू हिरेमठ, गजानन बेन्नाळकर, मराठा मंडळ कला, विज्ञान व गृह अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुपादय्या हिरेमठ, रोजगार विनिमय कार्यालय कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक नियंत्रक शिल्पा वाली आदी मान्यवर उपस्थित होते.
टाटा कॅपिटल, आयसीआयसी बँक, अदानी कॅपिटल, पेटीएम प्रायव्हेट लिमिटेड, बायजूस, अशोक आयर्न ग्रुप या रोजगार मेळाव्यात सहभागी झाले होते. या मेळाव्यात सहभागी झालेल्या ३८ कंपन्यांनी त्यांच्या गरजेनुसार उमेदवारांची निवड प्रक्रिया आयोजित केली होती.