Friday, April 26, 2024

/

बेळगाव विमानतळावरील स्थगित झालेल्या सेवांबाबत तीव्र नाराजी;

 belgaum

बेळगाव विमानतळाच्या सुविधांमध्ये अलीकडे भरपूर प्रगती झाली. बेळगावहून इतर शहरं आणि राज्यांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरु करण्यात आल्याने विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. विविध विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनीही बेळगाव विमानतळावर अधिक भर देत विविध ठिकाणी विमानप्रवासाची सोय करून दिली होती.

राज्यातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ आणि सर्वाधिक उड्डाणे घेणाऱ्या विमानतळांमध्ये बेळगाव विमानतळाचा समावेशही झाला. गजबजलेल्या हुबळीलाही गेल्या महिन्यात बेळगावने मागे टाकले. मात्र, अचानक एकामागोमाग एक १२ विमानसेवा रद्द झाल्या आणि विमानतळावरील असुविधेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागली. स्थगित झालेल्या विमानसेवेला सर्वस्वी भाजप नेतृत्व कारणीभूत असल्याचा आरोप पुढे आला असून स्थगित झालेल्या विमानसेवेचा परिणाम बेळगावच्या अर्थव्यवस्थेवर आणि शिक्षणावर होत असल्याची टीका आपचे युवानेते व सामाजिक कार्यकर्ते राजीव टोपण्णावर यांनी ट्विटद्वारे केली आहे. या ट्विटला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून शहरातील भाजप नेत्यांचा निषेध केला जात आहे.

जेव्हा विकास ठप्प होतो त्यावेळी भाजप नेते विविध स्पर्धांच्या माध्यमातून कल्पना लढवून जनतेची दिशाभूल करतात. नेत्यांच्या दृष्टिकोनातून शहराच्या अर्थव्यवस्थेला तसेच आरोग्य व शिक्षणाला नगण्य प्राधान्य आहे. अशा आशयाचा मजकूर सामाजिक कार्यकर्ते राजकुमार उर्फ राजीव टोपण्णावर यांच्या ट्विटमध्ये नमूद आहे. या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या असून काही नेटकऱ्यांनी टोपण्णावर यांना त्यांच्या ट्विटमध्ये शेजारील विमानतळाशी असलेल्या स्पर्धेचा मुद्दा समाविष्ट करण्यास सुचवले आहे.

 belgaum

याचप्रमाणे इतरांनीही अनेक पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खराब पायाभूत सुविधा, विमानतळाचा न झालेला विस्तार यामुळे विमानतळाची सद्यस्थिती चांगली नसल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. उडाण अंतर्गत योजनेचा कालावधी संपल्यानंतर विमान प्रवासात दोन ते तीन पटीने वाढ झाल्याने विमानसेवा रद्द होत असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आली आहे.

प्रगतीपथावर असलेल्या बेळगाव विमानतळाची अधोगती होण्यासाठी बेळगावचे राजकारणी कारणीभूत असून हे राजकारणी बिनकामाचे असल्याचा आरोपही काहींनी केला आहे. बेळगावची अधोगती झाल्यानंतर बेळगावला इतर शहरे गिळंकृत करतील, यामुळे शहराच्या नेतृत्वातच बदल होणे आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले आहे. शिवाय बेळगावपाठोपाठ प्रगतीपथावर असणाऱ्या हुबळी शहरातील विमानतळाची प्रगती चढत्या आलेखातच असून यामुळे बेळगावच्या विमानतळावर भविष्यात परिणाम झाले तर यात वावगे वाटण्यासारखे काही नसेल, आणि आश्चर्य वाटण्याचे कारणही नसेल, अशी मतेही मांडण्यात आली आहेत.

बेळगावमधील निष्क्रिय राजकीय नेत्यांचा फायदा हुबळीतील मंत्री घेत असून बेळगावच्या नेतृत्वात ताकद नसल्याचेही काहींनी मत मांडले आहे. बेळगावमधील राजकारण्यांना बोलण्याची आणि विरोध करण्याची ताकद नसल्याने बेळगाव सर्व काही गमावत चालले असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.