बेळगाव : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना १५ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम देण्याचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
यासंदर्भात ज्यादिवशी मुख्यमंत्री घोषणा करतील त्या दिवसापासून कटाक्षाने भरपाई देण्याची कार्यवाही होईल, अशी ग्वाही महसूलमंत्री आर. अशोक यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत मंगळवारी झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात टी. नरसीपूरचे आमदार एम. अश्विन कुमार यांनी वन्यप्राणी हल्ल्याचा मुद्दा मांडत या भागात ऊस तोडणीसाठी आलेले कामगार वन्य प्राण्यांच्या भीतीने ऊस तोडणी करत नसून मुख्यमंत्र्यांच्या नव्या आदेशानुसार, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
आमदार अश्विनकुमार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आर.अशोक म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून नंजनगुडू टी. नरसीपुरा येथे रानडुक्कर,आणि बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांना जीव गमवावा लागला आहे. या भागात विद्युत तारांचे कुंपण तसेच इतर उपाययोजनांच्या माध्यमातून वन्य प्राण्यांवर नियंत्रण ठेवले जात आहे.
ज्यांनी आधीच जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना प्राथमिक नुकसानभरपाई म्हणून ५ लाख देण्यात येतील. शवविच्छेदन अहवालानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नवीन आदेशानुसार एकूण १५ लाख रुपये मंजूर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आर. अशोक यांनी सांगितले.
मात्र टी नारासीपुर भागातील जनता शवविच्छेदन अहवालापर्यंत वाट न पाहता संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत असल्याचे आम. अश्विनकुमार यांनी नमूद केले. 1