Tuesday, January 7, 2025

/

महापौर निवडणुकीचा मुहूर्त पुन्हा टळला?

 belgaum

बेळगाव : सुमारे दीड वर्षाचा कालावधी उलटत आला तरी अद्याप बेळगाव महानगर पालिकेची महापौर – उपमहापौर निवडणूक घेण्यात आली नसून सरकारच्या विलंबाची धोरणामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे.

महानगरपालिकेचा कार्यभार दोन आमदारांच्या हाती असल्याच्या टीकाही अलीकडे होत असून आता सदर निवडणुकांसाठी पुन्हा काही कालावधी लोटण्याची शक्यता आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर – उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुका आता विधानसभा निवडणुकी नंतरच घेतल्या जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

येत्या ५ – ६ महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. साधारण एप्रिल किंवा मे महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार असून सध्या आरक्षणाचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होईल या अनुषंगाने ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजप सरकार कोणताच निर्णय घेण्याची घाई करत नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यामुळे ओबीसी आरक्षणासाठी स्थापन केलेल्या आयोगाचा अहवाल मिळूनही सदर अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणानुसार कर्नाटकात निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली नाही. मात्र याचा फटका बेळगाव मनपा महापूर-उपमहापूर निवडणुकीला बसला आहे.

गेल्या दीड वर्षांपासून महापौर निवडणुकीची प्रतीक्षा करणाऱ्या नगरसेवकांना आता पुन्हा विधानसभा निवडणुका होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असून या निवडणुकीनंतरच शपथविधी होईल, अशी शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी १९८४ मध्येही अशीच काहीशी गोष्ट घडली होती. पहिले लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आल्यापासून मनपाचे कामकाज प्रदीर्घ काळ चालविण्यात आले नाही. १० मार्च २०१९ रोजी मनपा लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ संपल्यानंतर सहा महिन्यात मनपा निवडणूक होणे आवश्यक होते. मात्र याचदरम्यान प्रभागवार पुनर्र्चनेविरोधात उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल झाल्याने न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली.

यानंतर २०२१ साली ऑगस्ट महिन्यात निवडणूक जाहीर झाल्या आणि सप्टेंबर २०२१ मध्येच या निवडणुकीचा निकाल देखील जाहीर झाला. निवडणुका पार पडून १५ महिने लोटले तरीही अद्याप महापौर – उपमहापौर निवडणुकीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नगरसेवकांकडून निवेदन देखील देण्यात आले.

राज्यात भाजप सरकारच सत्तेवर असल्याने तसेच यंदाच्या मनपा निवडणुकीत पक्षनिहाय निवडणुका झाल्याने भाजप बहुमतात आहे. यामुळे या निवडणूक ताबडतोब होतील, अशी शक्यता नगरसेवक व्यक्त करत होते. मात्र नगरसेवकांच्या या आशेवर पाणी फेरले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.