सरकारी व्यवस्थेतील शेवटचे जबाबदार कर्मचारी म्हणून ओळख असणाऱ्या तलाठी व्हिलेज अकाउंटंट पदाला आता अधिकारी म्हणून दर्जा प्राप्त होणार आहे. तलाठ्यांना ग्राम प्रशासकीय अधिकारी (व्हिलेज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, व्हीएओ) म्हणून ओळखले जाणार असून याबाबतचा सुधारित आदेश लवकरच बजावला जाणार आहे.
राज्याचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सुरू केलेल्या ग्राम वास्तव्य कार्यक्रमात सरकारी व्यवस्थेमध्ये तलाठी हेच सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे कर्मचारी असल्याचे त्यांना दिसून आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
तलाठ्यांची नियुक्ती ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होते. किमान बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवाराची मेरिट आधारावर यासाठी नियुक्ती केली जाते. राज्यात चार महसूल विभाग असून या चारही महसूल विभागाच्या प्रादेशिक आयुक्तांनी तलाठ्यांना अधिकारी म्हणून संबोधण्यासाठी यापूर्वी संमती दिली आहे.
त्यामुळे तलाठ्यांना लवकरच अधिकारी म्हणून संबोधले जाणार आहे. अधिकारी म्हणून जरी तलाठ्यांची श्रेणी बदलत असली तरी त्यांच्या नियुक्तीची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडेच असणार आहे. कोणत्याही प्रकारची वेतनश्रेणी आणि कर्तव्याची जबाबदारी यात बदल केला जाणार नाही. केवळ तलाठी हे नांव इतकेच बदलले जाणार आहे.
शासकीय थकीत वसुली, भू -दाखला पाहणी पत्रक, संपत्तीधारक मृत्यू पावल्यास किंवा जमिनीची विक्री झाल्यास न्युटेशन वही त्याची नोंद ठेवणे, वारसा, जमाबंदी हिशेब ठेवणे, निवडणूक कार्य, जन्ममृत्यू दाखला, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पंचनामा करणे, लाभार्थींची निवड करणे आणि महसूल खात्याशी संबंधित कामे करणे ही तलाठी अर्थात आता होणाऱ्या ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी असणार आहे