बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये 19 पासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी राज्यातून विविध अधिकारी, मंत्री बेळगावमध्ये दाखल होत आहेत.
एकीकडे सीमाप्रश्नावरून तापलेले वातावरण आणि दुसरीकडे याच काळात सुरु होणारे हिवाळी अधिवेशन यादरम्यान बंगळुरूहून बेळगावमध्ये दाखल झालेल्या कर्नाटक राज्य कृषी ग्रामीण विकास बँकेच्या मालकीच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. सदर प्रकारानंतर कन्नड वृत्तवाहिन्यांवर याचे खापर मराठी भाषिकांवर फोडण्यात येत असून सुवर्णसौधसमोर हा प्रकार घडला आहे.
बुधवारी सायंकाळी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत चालकावरदेखील हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सदर वाहनाच्या चालकाने या प्रकाराबाबत माहिती देताना आपल्यावर आणि आपल्या वाहनावर हल्ला करणारे हल्लेखोर मराठीत बोलत असल्याचे सांगितले आहे.
बेंगळुरूहून बेळगावमध्ये आपण दाखल झालो मात्र या गावचे नाव आपल्याला माहीत नसल्याचे सांगितल्यावर आपल्यावर हल्ला करण्यात आला. जिवाच्या आकांताने आपण वाहनासहित त्या ठिकाणाहून निसटलो आणि घडला प्रकार वरिष्ठांना कळविला.
२४ तास होऊनही या घटनेबाबत अद्याप कोणती कारवाई झाली नसून या प्रकरणाची नोंद हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास घेत आहेत. विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर अशाप्रकारच्या घटनेमुळे वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता असून हे कृत्य जाणीवपूर्वक करून मराठी भाषिकांना टार्गेट करण्यात येत असल्याची चर्चाही सीमाभागात सुरु आहे. मराठी भाषिकांना टार्गेट करण्यात यावे यासाठी अश्या घटना घडविल्या जात असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे.