बेळगाव: उत्तर कन्नड जिल्ह्यातील हल्याळ येथील आमदार, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांना २०२२च्या ‘सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कायदा व संसदीय कामकाज मंत्री जे.सी. मधुस्वामी, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बुधवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी पुरस्काराची घोषणा केली. १९८३ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आलेले आर. व्ही. देशपांडे आतापर्यंत ८ वेळा आमदारपदी विराजमान झाले आहेत.
सध्या त्यांना या सभागृहात सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा मान मिळाला आहे. लघु उद्योग, मोठे आणि मध्यम उद्योग, कृषी, फलोत्पादन, महसूल, कौशल्य विकास आणि इतर अनेक खात्यांचे मंत्री म्हणून त्यांना अनुभव आहे. माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले आर.व्ही. देशपांडे यांनी किमान १० मुख्यमंत्र्यांसोबत काम केले आहे.
सभागृहाच्या चौकटीच्या पलीकडे न जाता बोलण्याचा त्यांना अनुभव आणि ज्ञान आहे. ते एक उत्कृष्ट संसदपटू आहेत. शिवाय तिरुपती तिरुमला मंदिराचे विश्वस्त आणि हल्याळ येथील तुळजा भवानी मंदिर बांधकाम समितीचे विश्वस्त म्हणून धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातही काम पाहात आहेत. कॅनरा मेडिकल सेंटरच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रासाठी योगदान, हल्याळ येथील रुडसेट संस्थेच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार हि त्यांच्या सामाजिक कार्याची उदाहरणे आहेत.
हल्ल्याळ चे आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आर वी देशपांडे यांना उत्कृष्ट आमदार पुरस्कार pic.twitter.com/sxNtw1OBhp
— Belgaumlive (@belgaumlive) December 28, 2022
यावेळी मुख्यमंत्र्यांनीही आम. आर. व्ही. देशपांडे यांचे कौतुक करत सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कारासाठी निवड झाल्याने पुरस्काराचा सन्मान व मोल वाढल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. १० वर्षांहून अधिक काळ त्यांनी उद्योगमंत्री म्हणून औद्योगिक धोरण आणि विकासासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणांचे फायदे राज्याला मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. पक्षाचा विचार न करता त्यांच्यात मैत्री आणि जवळीक निर्माण झाली आहे. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचे अनेक मित्र आहेत. नवनिर्वाचित आमदारांसाठी आर.व्ही. देशपांडे यांचे वर्तन अनुकरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकारून सत्काराला उत्तर देताना आर. व्ही. देशपांडे बोलताना म्हणाले, राजकारण्यांबद्दलचे जनमत बदलले आहे ही चिंतेची बाब आहे. सार्वजनिक जीवनात स्वत:ची ओळख राजकारणी म्हणून करून देण्यास आपण कचरत असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकारण्यांबाबत जनमत बदलले आहे, ही आमची चूक आहे. लोकांसाठी काम करणे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे.
आमदारांनी सर्व विषयांची माहिती व ज्ञान संपादन करावे. विधानसभेचा आदर आणि शिस्त राखावी, असे आवाहन करत आपल्या आजवरच्या आयुष्यात देव, आई-वडील, वडीलधारी मंडळी आणि मतदार संघातील जनतेचे आशीर्वाद कामी आले असे सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.