टिळकवाडीतील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये काल क्षुल्लक कारणावरून मारहाणीची घटना घडली. पोलिसांचाही याला दुजोरा असताना सदर घटनेला भाषिक वादाचा रंग देऊन करवे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरपीडी कॉलेज रोडवर आंदोलनाच्या नावाखाली धुडगूस घातल्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली.
टिळकवाडीतील एका महाविद्यालयामध्ये काल बुधवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान क्षुल्लक कारणावरून कांही विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गातील एका विद्यार्थ्याला मारहाण केली. सदर प्रकरण पोलिसांपर्यंत गेले पोलिसांनी देखील सखोल चौकशीअंती शहानिशा करून कार्यक्रमादरम्यान नृत्य करताना एकाचा पाय दुसऱ्याच्या पायावर पडल्याने उद्भवलेल्या वादातून हाणामारीची घटना घडल्याचे स्पष्ट केले.
ही वस्तुस्थिती असताना या प्रकाराचा बाऊ करून त्याच्या निषेधार्थ करवे संघटनेने आज गुरुवारी सकाळी आरपीडी कॉलेज रोडवर आंदोलन छेडून रास्तारोको केला. कन्नड ध्वज फडकवण्यावरून संबंधित विद्यार्थ्याला मारहाण झाली आहे. हा कन्नड ध्वजाचा अपमान आहे असा आरोप करत पोलिसांनी कन्नडच्या हितरक्षणार्थ या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी शांततेने आंदोलन करण्याऐवजी आंदोलनकर्त्या करवे कार्यकर्त्यांनी धुडगूस घालून जोरजोराने घोषणाबाजी करत रस्त्यावर टायर देखील पेटवला. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आरपीडी कॉलेज रोडकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील वाहतूक अडवून ती अन्य मार्गाने वळविली. पोलिसांकडून अचानक हाती घेण्यात आलेल्या या उपायोजनेमुळे वाहन चालकांची मात्र मोठी गैरसोय होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
नेहमीचा रस्ता पोलिसांनी अडवल्यामुळे वाहन चालकांना दूरच्या अन्य मार्गाने इच्छित स्थळी पोहोचावे लागले. त्यामुळे शांतता बिघडवणाऱ्या करवे संघटनेच्या आंदोलनाबद्दल वाहन चालकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत होती.