अलारवाड ब्रिजकडून हलगा गावाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर रेशनच्या तांदळाची बेकायदा तस्करी करणाऱ्या दोन वाहनांवर शनिवारी रात्री कारवाई करून अन्न व नागरी पुरवठा खाते आणि हिरे बागेवाडी पोलिसांनी दोघांना अटक करण्याबरोबरच लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदानंद लक्ष्मण पाटील (रा. कोल्हापूर) आणि यल्लाप्पा भीमशेप्पा बजंगी (रा. मरिकट्टी ता. बैलहोंगल) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्नभाग्य योजनेअंतर्गत शिधापत्रिकावर दिल्या जाणाऱ्या रेशनच्या तांदळाची बेकायदा तस्करी होत
असल्याची माहिती मिळताच अन्न व नागरी पुरवठा खाते आणि हिरेबागेवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री अलारवाड ब्रिजकडून हलग्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर एक लॉरी आणि मिनी गुड्स टेम्पो अडवून झडती घेतली. यावेळी लॉरी चालक सदानंद याला ताब्यात घेऊन 42 हजार रुपये किमतीचा 15 क्विंटल तांदूळ आणि 1 लाख 30 हजार रुपये किमतीची लाॅरी (क्र. एमएच 09 सी यु 8592) जप्त केली.
त्याचप्रमाणे मिनी गुड्स टेम्पो चालक यल्लाप्पा याला ताब्यात घेऊन टेम्पोतील 47 हजार रुपये किमतीचा 17 क्विंटल तांदूळ आणि 80 हजाराचा टेम्पो (क्र. केए 22 डी 7226) जप्त करण्यात आला. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.