बेळगाव : बेळगावमधील भूतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा मिनी प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते पार पडले.
उद्घाटनानंतर बोलताना यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार आणि केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी बोलताना म्हणाले, म्हैसूर नंतर बेळगावमधील भूतरामहट्टी येथे सर्वोत्तम प्राणी संग्रहालय उभारण्यात आले आहे. या प्राणिसंग्रहालयाच्या विकास ५ टप्प्यात करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील कामकाज पूर्ण झाले आहे. उर्वरित कामकाज लवकरच पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या प्राणिसंग्रहालयाच्या माध्यमातून रोजगार हमी योजने अंतर्गत २ कोटी रुपयांच्या निधीतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच येथील विकासकामात नरेगा प्रकल्पाशी संबंधित जी कामे आहेत ती येत्या ३ महिन्यात पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.
उदघाटन समारंभास जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री सी. सी. पाटील, खास. आण्णासाहेब जोल्ले, धर्मादाय विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले, वनविभाग अपर मुख्य सचिव जावेद अख्तर, जिल्हा प्रभारी सचिव एल. के. अतिक, प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. आदींसह वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.