हिंडलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर हे भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळावे अशी विनंती माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याकडे केली आहे.
बेळगाव ग्रामीण मतदार संघात भाजपच्या प्रत्येक कार्यात आघाडीवर राहून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सातत्याने झटणारे हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांना या मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळवून देण्यासाठी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
दिल्ली मुक्कामी तळ ठोकून असलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी नुकतीच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी त्यांच्या समवेत बेळगावचे युवा भाजप नेते किरण जाधव आणि हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर हे देखील उपस्थित होते.
बी. एल. संतोष यांच्याशी बोलताना माजी मंत्री जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात 70 टक्के मराठी मतदान आहे. त्यामुळे मराठी माणसालाच भाजपची उमेदवारी दिली जावी असे तेथील जनतेचे मत आहे. नागेश मन्नोळकर आणि त्याचे ज्येष्ठ बंधू हे दोघेही पूर्वीपासून भाजपचे कार्यकर्ते आहेत.
नागेश मन्नोळकर हे यशस्वी व्यावसायिक असण्याबरोबरच धडाडीचे सामाजिक कार्यकर्तेही आहेत. आपल्या ग्रामपंचायत अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी उत्तम कार्य केले आहे असे सांगून बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसला धूळ चारायची असेल तर मोठ्या प्रमाणात होणारे मराठी भाषिकांचे मतदान लक्षात घेता नागेश मन्नोळकर यांनाच उमेदवारी दिली जावी, अशी विनंती केली.
आगामी विधानसभा निवडणूक अद्याप सहा महिने दूर असली तरी बेळगाव ग्रामीण मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी आत्तापासून तयारी सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी भाजपचे माजी आमदार संजय पाटील, धनंजय पाटील वगैरे मंडळी प्रयत्नशील असताना दुसरीकडे नागेश मन्नोळकर यांनी लॉबिंग सुरू केली आहे. बेळगाव ग्रामीणमध्ये ही परिस्थिती असताना बेळगाव दक्षिण मतदार संघातून किरण जाधव यांना भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.