बेळगाव शहरातील नामांकित मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांना गोवा येथे गेल्या शनिवारी झालेल्या दिमाखदार पदवीदान सोहळ्यात आंतरराष्ट्रीय सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीतर्फे मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले आहे.
कंट्री इनन कांदोलियम गोवा हॉटेलच्या भव्य सभागृहात गेल्या शनिवारी आयोजित पदवीदान सोहळ्यात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजश्री नागराजू यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरू डॉ. सॅबॅस्टिन मेंडीस, फादर ॲलेन नोरोहा, डाॅ. कल्याण चक्रवर्ती, गिरीशम वाकोळे, कर्नाटकचे विद्यमान विधान परिषद सदस्य नागराजू यादव आदींसह मराठा मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मराठा मंडळ ही नामांकित शैक्षणिक संस्था असून अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून ही संस्था शैक्षणिक प्रगती करत आहे. राजश्री नागराजू (हलगेकर) या 2005 सालापासून या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच एड्स जनजागृती, शिका आणि शिकवा, भ्रष्टाचार निर्मूलन, मलाही जगू द्या हा स्त्रीभ्रूणहत्येचा ज्वलंत प्रश्न, गणपती बाप्पा बुद्धी द्या आता, कोरोना काळात गरजूंना अन्नदान असे उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
महिलांची विशेष काळजी घेणाऱ्या राजश्री नागराज यांनी बेळगाव परिसरात झालेल्या स्त्रिया अन्यायाविरोधात वेळोवेळी आवाज उठविला असून दिल्ली येथील निर्भया हत्याकांडानंतर त्यांनी संस्थेच्या बऱ्याच महाविद्यालयांमध्ये निर्भया कक्ष निर्माण केले. याचबरोबर मराठा मंडळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मदतीने सॅनिटरी पॅडची निर्मिती करून त्याचे मोफत वितरण सुरू करून समस्त विद्यार्थिनींना स्वावलंबन शिकविले आहे. राजश्री नागराजू यांना यापूर्वी वीरराणी चन्नम्मा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.