बेळगाव धारवाड ते हरिहरपर्यंत पेशव्यांनी व शाहू महाराजांनी कन्नड शाळा बंद करून मराठी शाळा सुरू केल्या होत्या, असे वादग्रस्त वक्तव्य केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष व माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले आहे. यावरून कर्नाटकमध्ये मराठी भाषा व मराठी भाषिकांबद्दल किती द्वेष केला जातो हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील यड्राव गावामध्ये केएलई संस्थेच्या कन्नड शाळेचा उद्घाटन समारंभ काल गुरुवारी पार पडला. त्याप्रसंगी डॉ. कोरे बोलत होते.
केएलई संस्था नसती तर आज बेळगाव कर्नाटकात राहिले नसते अशी अतिशयोक्ती करून ते पुढे म्हणाले केएलईने सीमाभागात अनेक कन्नड शाळा सुरू करून बेळगाव व सीमा भागात कन्नड वाढविण्याचे काम केले आहे.
यावेळी त्यांनी हा भाग मुंबई प्रांतात असल्याने त्याकाळी शाहू महाराजांनी व पेशव्यांनी बेळगावसह हरिहर पर्यंतच्या भागात कन्नड शाळा बंद करून मराठी शाळा सुरू केल्या होत्या.
त्यामुळे रायबाग भागात देखील प्रत्येक गावात मराठी शाळा होत्या. सीमा भागात कन्नड शाळा वाढवण्याची गरज आहे. कन्नड वाढविण्यासाठी सरकारने खाजगी शाळांना दोन वर्षानंतर सरकारी अनुदान सुरू केले पाहिजे, असे मतही डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले.