बेळगावमध्ये उद्या 19 डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या स्थळाला आज राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) अलोक कुमार यांनी भेट देऊन पाहणी केली.
शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या 19 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी क** पोलीस बंदोबस्त ठेवावा. योग्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबरोबरच ड्रोन कॅमेराचा अवलंब करावा, अशी सूचना एडीजीपी अलोक कुमार यांनी व्हॅक्सिन डेपो मैदानाला दिलेल्या भेटी प्रसंगी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना केली.
सदर मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील माने बेळगावला येणार आहेत ते खरे आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार धैर्यशील माने यांना बेळगावत प्रवेश करण्यास परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती एडीजीपींनी दिली. बेळगावातील जनता या महामेळाव्याला आली तर आम्ही त्यांना अडवणार नाही मात्र परगावहून येणाऱ्या लोकांना बेळगाव प्रवेश नाकारला जाईल महाराष्ट्रातून या मेळाव्यासाठी येणाऱ्या कोणालाही बेळगावात प्रवेश दिला जाणार नाही, असे एडीजेपी अलोक कुमार यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सीमा भागात विविध 21 ठिकाणी तपासणी नाके (चेक पोस्ट) उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह एकूण 230 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकंदर या अधिवेशनासाठी 5000 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली