गर्भवती महिलेचा खून करून आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी गावात शनिवारी पहाटेच्या सुमारास तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेवर तिच्या सासरच्या मंडळींनी जीवघेणा हल्ला करून तिचा खून केला आहे. यानंतर तिला फासावर लटकविल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सदर खुनाला चार दिवस उलटूनही एफआयआर दाखल न झाल्याने काकती पोलिसांकडे संशयाच्या नजरेने पहिले जात आहे. शिवाय काकती पोलिसांनी गुंडांना संरक्षण दिले असल्याचा आरोप केला जात आहे. तुरुंगात असलेल्या आरोपीने पोलिसांसोबत सौदा केला असून बेळगाव आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने काकती पोलिसांकडे पुन्हा नागरिकांनी संशयाचे बोट दाखविले आहे.
गौरम्मा मंजुनाथ कोण्णूरी (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे. जुन्या होसूर गावातील फकीराप्पा आणि हनुमाव्वा वरद या दाम्पत्याने आपल्या त्यांच्या धाकट्या मुलीचे लग्न तीन वर्षांपूर्वी न्यू वंटमुरी गावातील मंजुनाथ यल्लाप्पा कोण्णूर याच्याशी लावून दिले होते. लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून सातत्याने गौरम्माचा छळ करण्यात येत होता. अनेकवेळा ती या जाचाला कंटाळून माहेरी यायची. मात्र पुन्हा पती येऊन तिला परत घेऊन जायचा. गौरम्माला याआधी एक अपत्य असून सध्या ती तीन महिन्यांची गर्भवती होती. शनिवारी सकाळी गौरम्माचा पती मंजुनाथ, सासरे यल्लाप्पा सिद्धाप्पा कोण्णूरी, सासू रेणुका यल्लाप्पा कोण्णूरी यांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. तिचा जीव गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तिला फासावर लटकावून आत्महत्या केल्याचे भासविले. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास हि घटना घडल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. मात्र सायंकाळी ४ नंतर येथे पोलीस आले. आणि ६ वाजले तरीही गौरम्माच्या माहेरच्या मंडळींना या गोष्टीबद्दल माहिती देण्यात आली नाही. स्थानिकांनी माहिती कळविल्यानंतर गौरम्माची माहेरची मंडळी तिच्या सासरी दाखल झाली. तत्पूर्वी माहेरची मंडळी येत असल्याची माहिती मिळाल्याने गौरम्माच्या पतीसह सासू-सासऱ्यांनी तेथून पळ काढला. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र तेथील काहींनी पुढाकार घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. याशिवाय पुरावे नष्ट करण्यासाठी काही जणांनी कट रचून घराला आग लावून फिर्याद दाखल केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला. हि घटना काकती पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत घडली असून याप्रकरणी काकती पोलिसांनी जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेला चार दिवस उलटूनदेखील काकती पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाही. सध्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री बेळगावात आले असून ते बेळगावमधून गेल्यानंतर ‘ऍक्शन मोड’ वर येऊ असे सांगण्यात येत आहे. शवविच्छेदन होऊन देखील अद्याप एफआयआर दाखल का केला नाही? पोलीस अशापद्धतीने उत्तर देण्यामागची कारण काय? फरार आरोपींना पोलिसांनी का अभय दिले? बेळगावमध्ये मुख्यमंत्री असूनही महिलेसोबत झालेला हा निर्घृण प्रकार घडतो आणि याप्रकरणी पोलीस अधिकारी शांत का? असा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.