महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा कोणत्याही परिस्थितीत १९ डिसेंबर रोजी यशस्वी होणारच. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गावोगावी जनजागृती करावी, असे आवाहन करताना महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार तालुका म. ए .समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
मराठा मंदिरात महामेळाव्यासंदर्भात गुरुवारी माजी आमदार कार्याध्यक्ष मनोहर किनेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.व्यासपीठावर माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, मनोहर संताजी होते.
माजी आमदार मनोहर किनेकर म्हणाले, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होणारच. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपले कर्तव्य आणि जबाबदारी समजून मोठ्या संख्येने मैदानावर एकत्र यावे. कार्यकर्त्यांनी विभागावर आणि गावोगावी जनजागृती बैठका घ्याव्यात.
माजी महापौर शिवाजी शंकर म्हणाले, विकासाच्या नावाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या नादी लागू नये. चाबूक मोर्चातील लोकांची संख्या पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आज पर्यंत शेतकऱ्यांचे नेतृत्व केवळ महाराष्ट्र केसरी समितीनेच केले आहे. त्यामुळे समितीची ताकद वाढली आहे.19 तारखेचा महामेळाव्यातून मराठी भाषिकांची ताकद पुन्हा एकदा भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन दाखवून द्यावी.
माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि माने यांनी लोकसभेत बेळगावचा मुद्दा उचलला मात्र उर्वरित भाजपच्या खासदार का गप्प राहिले त्यांनी देखील हा मुद्दा मांडणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
हुतात्म्यांच्या बलीदानामुळे लढा पवित्र झाला आहे. आता प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून सीमाप्रश्न सुटेपर्यंत लढा देणे आवश्यक आहे, असे सांगितले.
यावेळी पुंडलिक पावशे, भागोजी पाटील, कृष्णा हुंदरे, ॲड. सुधीर चव्हाण, मनोहर संताजी आदींनी मनोगत व्यक्त केली.