व्हॅक्सिन डेपो मैदानावरील महामेळाव्याला उपस्थित राहण्यास जाणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कायदे सल्लागार ॲड. सुधीर चव्हाण आणि ॲड. श्याम पाटील या उभयतांना त्यांच्या समर्थकांसह आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्धतेत ठेवले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने व्हॅक्सिन डेपो मैदानावर आज सोमवारी सकाळी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परवानगी नाकारण्याबरोबरच पोलीस प्रशासनाने मैदान परिसरात 144 कलमान्वये जमाबंदीचा आदेश जारी केला आहे. तथापि मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी एकीकरण समितीचे कायदे सल्लागार ॲड. सुधीर चव्हाण आणि ॲड. श्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती कार्यकर्ते व मराठी भाषिकांच्या मोठ्या फळीने व्हॅक्सिन डेपोकडे कूच केली होती.
मात्र कर्नाटक पोलिसांनी त्यांना मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यास अडकाठी करण्याबरोबरच ॲड. चव्हाण आणि ॲड. पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांच्या या कृतीचा तीव्र निषेध करत कार्यकर्त्यांनी बेळगाव कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में वगैरे घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. ताब्यात घेतलेल्या सर्वांना पोलिसांनी स्थानबद्धतेत ठेवले आहे.
दरम्यान महामेळावाला उपस्थित राहण्यासाठी आज सकाळी विशेष करून बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील ठिकठिकाणांहून शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते व मराठी भाषिक व्हॅक्सिन डेपो मैदानाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. मात्र सदर मैदानाच्या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स टाकून अडविले होते.
मैदानाचा परिसर संपूर्णपणे सीलबंद करण्यात आला होता. मेळाव्याला परवानगी नाकारून 144 कलमान्वये जमाबंदीचा आदेश लागू करण्यात आल्यामुळे व्हॅक्सिन डेपोच्या दिशेने कोणालाही जाऊ दिले जात नव्हते.
पोलीस वाहनातून स्पीकरवर जमाबंदीच्या आदेशासंबंधी घोषणा केली जात होती. पोलिसांकडून सर्वांना माघारी हुसकावून लावण्यात येत होते. सदर प्रकारामुळे त्या भागातील सर्वसामान्य नागरिकांना देखील मनस्ताप सहन करावा लागल्यामुळे पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्याबरोबरच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत होत्या.