सरकारच्या कोरोना मार्गदर्शक सूचीनुसार सरकारी शाळा वगळता जवळपास सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना फेस मास्क वापरण्याची सूचना करण्यास सुरुवात केली असून कांही शाळांनी तर गेल्या सोमवारपासूनच शाळेत मास्क सक्तीचे अंमलबजावणी सुरू केली आहे.
कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारने शाळा -महाविद्यालयं, थिएटर व गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची स्पष्ट सूचना केली आहे. खाजगी शाळांनी मास्क वापरण्याबाबत विद्यार्थ्यांत जनजागृती करत वर्गात मास काढू नका असे आवाहन केले आहे. मात्र अजूनही सरकारी शाळांमध्ये मास्कचा वापर केला जात नसल्याचे दिसून येत आहे.
शिक्षण खात्याने सर्व शाळांना कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शाळांना काळजी घ्यावी लागणार असून येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये. तसेच शाळा पुन्हा बंद होणार नाहीत, याकडे शिक्षण खात्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे अनेक महिने शाळा बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमताही कमी झाल्याचे दिसून आले होते.
दरम्यान, शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी शहरातील शाळांनी सर्व विद्यार्थ्यांना फेस मास्क वापरा अशी सूचना करावी. तसेच अधिक प्रमाणात गर्दी टाळण्याबरोबरच आरोग्य विभागाच्या सूचनांची दखल घेऊन शाळांनी स्वतःहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले आहे.