सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम आहे. महाराष्ट्रानेच महाजन आयोग नेमण्याची मागणी केली होती. आता तेच जर तो अहवाल फेटाळत असतील तर आम्ही ते मान्य करणार नाही. कन्नड भाषेच्या रक्षणाच्या बाबतीत आम्ही कसली तडजोड करणार नाही, असे राज्याचे कायदा व संसदीय व्यवहार मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळ अधिवेशनाच्या आज मंगळवारी दुसऱ्या दिवशी बेळगाव विधानसौधमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्राने महाजन अहवाल नेमण्याची मागणी केली होती. हा प्रश्न सुटावा म्हणून तत्कालीन कर्नाटक सरकारने त्याला सहमती दर्शवली होती.
आता त्याच आयोगाचा अहवाल महाराष्ट्र मान्य करत नसेल तर ते आम्ही सहन करणार नाही. कन्नड भाषेच्या रक्षणाच्या बाबतीत सरकार कसलीही तडजोड करणार नाही, असे मंत्री माधुस्वामी यांनी सांगितले.
एससी -एसटी आरक्षण विधेयकावरून काँग्रेसने स्थगन प्रस्ताव दिल्याच्या मुद्द्यावर मंत्री माधुस्वामी म्हणाले, आम्ही विधेयक मांडले आहे आणि ते आज यादीत आहे. सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्वांशी चर्चा करून सर्व पक्षीयांनी संमती दिल्यानंतरच आम्ही हे विधेयक मंजूर करून घेतले आहे. यावरून आम्ही नव्हे तर काँग्रेसने राजकीय स्टंट सुरू केला आहे.
सर्वांनी बसून चर्चा केल्यानंतर सर्वांच्या संमतीने हे विधेयक मांडले आहे. त्या बैठकीला सिद्धरामय्या, कुमारस्वामी दोघेही उपस्थित नव्हते का? असा सवाल त्यांनी केला. तुम्ही काय करता ते करा एससी -एसटींना मदत करा असे म्हणणारे कोण आहेत? आम्ही तुमचा सल्ला घेतला आणि त्याप्रमाणे केले. आता अशी राजकीय टीका करणे योग्य नाही. हे तुम्हाला शोभत नाही अशा शब्दात माधुस्वामी यांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले.