बांधकाम कामगारांसाठीच्या गृहलक्ष्मी बॉंड या विवाह अर्थसाह्य योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 50 हजार रुपयांच्या अर्थसहाय्यामध्ये आता आणखी 10 हजार रुपयांची रक्कम वाढविण्याचा निर्णय बांधकाम कामगार कल्याण मंडळाने घेतला आहे.
कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यातील बांधकाम कामगारांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून बांधकाम कामगारांना विवाहसाठी सहाय्य धन योजना आहे.
याद्वारे विवाहासाठी कामगारांना 50 हजार रुपयांपर्यंत सहाय्य केले जाते. आता या रकमेत 10 हजाराची वाढ करण्यात आल्यामुळे बांधकाम कामगारांना विवाहासाठी 60,000 रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य मिळणार आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. अर्जदाराकडे बांधकाम कामगार महामंडळाचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. सहाय्यधन मिळण्यासाठी बँक तपशील, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, लग्नपत्रिका, राज्याबाहेर विवाह झालेला असल्यास प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.
त्याचप्रमाणे रेशन कार्ड आणि विवाह झाल्यापासून 6 महिन्यात अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज आल्यानंतर त्याची पडताळणी कामगार विभागाच्या निरीक्षकांमार्फत केली जाणार आहे. आता विवाह सहाय्यधनात वाढ करण्यात आल्यामुळे बांधकाम कामगारांच्या अंगावर पडणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत मिळणार आहे.