सीमा प्रश्नसंदर्भात महाविकास आघाडीचे खासदार गृहमंत्र्यांना भेटणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून शुक्रवारी सकाळी सव्वा अकराची वेळ देण्यात आली आहे त्यामुळे सदर बैठक आज होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेना काँग्रेसचे खासदार अमित शहा यांना भेटणार आहेत.
गुरुवारी दुपारची वेळ होती मात्र ती बैठक रद्द झाली होती आता केंद्रीय गृह मंत्र्यांनी पुन्हा शुक्रवारची वेळ दिली आहे. कालच महाविकास आघाडीच्या खासदारांनी गृह मंत्री अमित शहा यांना पत्र देऊन सीमा वादात मध्यस्थी करण्याची विनंती केली होती त्यानंतर आता शहा यांनी शुक्रवारी सकाळी भेटीसाठी वेळ दिली आहे.
त्यामुळे आज अमित शहा यांच्यासोबत सीमा प्रश्न बाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे खासदार सुरेश धनोरकर, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, विनायक राऊत, श्रीनिवास पाटील, राजन विचारे, डॉ अमोल कोल्हे, ओमराजे निंबाळकर व सुनील तटकरे यांचा समावेश अमित शहा यांच्या भेटीला जाणाऱ्या शिष्टमंडळात असू शकतो.
बेळगाव सीमा वादावर सीमेवर असलेला तणाव मराठी भाषकांची गळचेपी याबाबत बैठकीत चर्चा होऊ शकते त्यामुळे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह बेळगाव प्रश्नावर मध्यस्थी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बेळगाव प्रश्नावर सध्या दिल्लीत वेगवान घडामोडी घडताना दिसत असून पुन्हा एकदा बेळगाव प्रश्न राष्ट्रीय पटलावर दाखल झाला आहे.दोन दिवसापूर्वी झालेले कन्नड वेदिके चे आंदोलन,महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात झालेली प्रवेश बंदी,राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनीही घेतलेली दखल या मुळे बेळगाव सीमा वादा बाबत घडामोडी वाढल्या आहेत.