बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. यामुळे सीमाप्रश्नावर चर्चा होऊन हा वाद संपुष्टात आणणे शक्य आहे.
मात्र भाजप सरकार सीमाप्रश्नाचा वापर राजकीय भांडवल म्हणून करत असल्याचा आरोप आमदार प्रियांक खर्गे यांनी केला. सुवर्णविधानसौध येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या खर्गे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यानीं भाजपवर हल्लाबोल केला.
नुकत्याच झालेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीवरदेखील त्यांनी टीका केली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमवेत झालेली बैठक हि निरर्थक असल्याचा टोलाही लगावला.
बैठकीत सीमाप्रश्नावर झालेली चर्चा देखील निरुपयोगी ठरली असून भाजपचे ट्रिपल इंजिन सरकार असूनही केंद्रस्तरावर बैठक होऊनदेखील सीमेवरील गोंधळ कमी झाला नसल्याचे ते म्हणाले.
सीमाप्रश्न हा भाजपासाठी राजकीय फासा असल्याचा आरोपही खर्गे यांनी केला. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत गृहमंत्र्यांनी सीमाप्रश्नासंदर्भात केलेल्या सूचना ऐकून याप्रश्नी असलेल्या अडचणी कमी होणे गरजेचे होते. मात्र गृहमंत्र्यांच्या सूचना निरर्थक ठरल्या आहेत, असा टोला त्यांनी लगावला.